अविवाहित पुरुषांना करोनामुळे मृत्यूचा धोका जास्त

फोटो साभार टाईम्स ऑफ इंडिया

जगभरची डोकेदुखी बनलेल्या करोना विषाणूवर अक्षरशः हजारो प्रकारची संशोधने सुरु आहेत आणि रोज काही तरी नवीन माहिती पुढे येत आहे. त्यात आता आणखीनच विचित्र माहिती स्वीडन मध्ये झालेल्या संशोधनात पुढे आली असून त्यामुळे जगभरातील वैज्ञानिक चक्रावले आहेत. या संशोधनात करोनामुळे मृत्यूचा धोका अविवाहित पुरुषात जास्त असल्याचे समोर आले आहे.

स्वीडन येथील युनिव्हर्सिटी ऑफ स्टॉकहोम येथे हे संशोधन करण्यात आले. त्यात असे दिसले की अविवाहित पुरुषात करोनामुळे येणाऱ्या मृत्यूचा धोका दीडपटीने अधिक आहे. कोविड १९ मुळे झालेल्या मृत्यूच्या नोंदणीचा आधार यासाठी घेण्यात आला. स्वीडिश नॅशनल बोर्ड ऑफ हेल्थ आणि वेलफेअर रिसर्च नुसार लग्न न झालेल्या पुरुष आणि महिलांना करोना मुळे मृत्यूचा धोका विवाहितांच्या तुलनेत दीडपटीने जास्त आहे. याचे मुख्य कारण विवाहित लोकांच्या तुलनेत अविवाहित लोक कमी सुरक्षित वातावरण अनुभवतात हे असावे.

जनरल नेचर कम्युनीकेशनने प्रकाशित केलेल्या या संशोधनात २० वर्षे व त्यापेक्षा अधिक वयाच्या लोकांना सामील केले गेले होते. त्यात विवाहित, अविवाहित महिला पुरुष, घटस्फोटीत, विधवा आणि विधुर यांचा समावेश होता. यापूर्वी महिलांपेक्षा पुरुषांना करोनाचा धोका असल्याचे स्पष्ट झालेले आहेच. ताज्या आकडेवारी नुसार जगात करोना संक्रमितांची संख्या ३ कोटी ७४ लाखांवर गेली असून ११ लाखाहून अधिक बळी पडले आहेत.