पुढील वर्षी प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा बहुचर्चित सूर्यवंशी, तर यावर्षीच्या ख्रिसमसमध्ये ’83’ येण्याचे संकेत


देशावर ओढावलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनला अनलॉकिंगमध्ये परिवर्तित करण्याची प्रक्रिया जोर धरत आहे. त्यानुसार देशासह राज्यातील अनेक गोष्टी खुल्या केल्या जात आहेत. आता अटीशर्तींसह दुकाने, हॉटेल्स-बार आदी अनेक गोष्टींना परवानगी मिळाली आहे. या गोष्टी सुरु झाल्या असतील तरी थिएटर्स का बंद आहेत? अशी मागणी होत असतानाच केंद्र सरकारने येत्या 15 ऑक्टोबरपासून थिएटर्स खुली करण्याचा निर्णय घेतला. त्याच पार्श्वभूमीवर आणखी दोन चित्रपटांनी आपल्या तारखा निश्चित केल्या आहेत.

अनेक निर्माते लॉकडाऊन लागू झाल्यानंतर ओटीटीच्या मार्गावर गेले. त्यावेळी थिएटर लॉबी आणि निर्माते यांच्यात वादही झाले. एरवी थिएटरसाठी आसुसलेले लोक आता मात्र ओटीटीमुळे आपल्याकडे पाठ फिरवत असल्यामुळे थिएटर लॉबीने नाराजीही व्यक्त केली. अनेक चित्रपट ओटीटीवर आले. पण असे असले, तरी थिएटर मालकांना सूर्यवंशी आणि 83 चित्रपटांनी पाठिंबा दिला होता. आपण चित्रपट थिएटरमध्ये रिलीज करु असे या दोन्ही चित्रपटांनी सांगितल्यामुळे थिएटरवाल्यांच्या जीवात जीव आला होता. आता हे दोन्ही चित्रपट रिलीज झाल्यानंतर पुन्हा लोक थिएटरकडे वळतील असा विश्वास सर्वांना होता. पण त्यानुसार या चित्रपटांच्या तारखा निश्चित होत नव्हत्या. आता या चित्रपटाच्या तारखा निश्चित झाल्या आहेत. सूर्यवंशी हा चित्रपट सुरुवातीला दिवाळीत रिलीज होणार होता. तर येत्या ख्रिसमसला 83 हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. पण आता त्यांच्या अंतिम तारखा नक्की झाल्या आहेत.

83 हा चित्रपट ठरल्यानुसार ख्रिसमसलाच रिलीज होणार आहे. तर सूर्यवंशी आता दिवाळीत प्रदर्शित न होता 2021च्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच, 26 जानेवारीला रिलीज करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. रिलायन्स समुहातर्फे एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत याला दुजोरा देण्यात आला आहे. हे दोन्ही चित्रपट लॉकडाऊननंतर अत्यंत महत्वाचे मानले जात आहेत. रणवीर सिंग, दीपिका पादुकोण आदी मंडळी 83 या चित्रपटात आहेत. तर सूर्यवंशी या चित्रपटात अक्षयकुमार, अजय देवगण, रणवीर सिंग अशी स्टारकास्ट असणार आहे. हा चित्रपट रोहित शेट्टीने दिग्दर्शित केला असून, हा चित्रपट एकूण इंडस्ट्रीला पुन्हा एकदा उभारी देईल अशी आशा सर्वांना आहे.

मागील सात महिन्यांपासून थिएटर इंडस्ट्री बंद असल्यामुळे इंडस्ट्री आणि थिएटरवाल्यांना एका नव्या उभारीची गरज आहे. येत्या 15 ऑक्टोबरपासून देशातील थिएटर्स अटीशर्थींसह सुरु करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार येत्या 15 ऑक्टोबरला पीएम नरेंद्र मोदी हा चित्रपट रिलीज होईल तर 16 ऑक्टोबरला खालीपिली हा ओटीटीवर आलेला चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. केंद्राने थिएटर खुली करण्याचा निर्णय घेतला असला तरी महाराष्ट्रातील सरकारने थिएटर खुली करण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. राज्य सरकार तो निर्णय येत्या 1 नोव्हेंबरपासून घेईल असा अंदाज वर्तवला जात आहे.