किरकोळ दुखण्यांसाठी घरगुती उपचार

pain

आपण स्वतःची कितीही काळजी घेतली तरी अनेक बारीक सारीक दुखणी किंवा जखमा आपल्याला होतातच. आणि अशी बारीकसारीक दुखणी होणे किवा जखमा होणे हे आपल्या इतके अंगवळणीही पडलेले असते की त्यासाठी विशेष कांही करावे असे आपल्या मनातही येत नाही. स्वयंपाकघरात काम करणार्‍या महिलांना तर सतत भाजणे, कापणे असल्या छोट्या प्रसंगाना सततच सामोरे जावे लागते. बरेच वेळा या असल्या जखमांकडे दुर्लक्षही केले जाते कारण त्या आपोआपच बर्‍याही होत असतात. मात्र तरीही असल्या दुखण्यांवर लगेच डॉक्टरकडे धाव न घेता स्वयंपाकघरातलेच पदार्थ वापरून चांगले उपचार करता येतात. असे कांही उपचार

१) कापणे- हातापायाला व अन्य कोठेही कापले असेल व थोडेच रक्त येत असेल तर तेथे हळद भरावी. एरंडेल तेल लावल्यानेही कापलेली जखम लवकर भरते व रक्तही थांबते. मात्र कापण्याची तीव्रता अधिक असेल व रक्तस्त्राव जास्त होत असेल तर जखमेत काताची (विडयात घालतो त्या) बारीक पूड भरावी.

२) भाजणे- भाजलेल्या जागी खोबरेल तेल लावावे.

३) बोटे आखडणे- बोटे आखडणे हे रक्त प्रवाहात अडथळा निर्माण झाल्यामुळे  होत असते. यावर शेकणे व बोटांची हालचाल करण्याने आराम पडतो.

४) घामोळे- उन्हाळयात हा त्रास मुख्यत्वे होतो. चंदन पावडर अंगावर टाकून तासभर ठेवावी व मग आंघोळ करावी. अथवा धन्याची अगदी बारीक पावडर करून याच पद्दतीने १ तास अंगावर ठेवून मग आंघोळ करावी. याने घामोळ्याचा त्रास खूपच कमी होतो व त्वचेला गारवाही मिळतो.

५) भूक न लागणे – अनेकवेळा आपल्याला कडकडून भूक लागत नाही आणि अस्वस्थता येते. अशावेळी गरम पाण्यात लिंबू सरबत करून थोडे थोडे सरबत थोडया थोडया वेळाने घ्यावे. पचन सुधारून भूक लागण्यास त्यामुळे मदत मिळते.

६) थंडीत अंग फुटणे- थंडीच्या दिवसात हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी होते व परिणामी अंग फुटते. त्यावर १ भाग एरंडेल व २ भाग खोबरेल तेल एकत्र करून गरम करावे. त्यामुळे त एकजीव होइल. हे मिश्रण आठवडयातून दोन वेळा अंगाला चोळावे. त्यामुळे त्वचा नरम राहते.

७) कीटक. मधमाशी, विचू दंश –  हा प्रकार तसा अनपेक्षितपणे होणारा असतो. दंश झालेल्या जागी जळजळ होते व बरेचवेळा वेदनाही होतात. अशावेळी दंशाच्या जागेवर एरंडेल तेल लावावे.एरंडेल तेलामुळे शरीरात दंशामुळे गेलेले विष बाहेर निघून जाण्यास मदत मिळते.

८) उचकी लागणे- उचकी हा धड आजार ही नाही आणि विकारही नाही. मात्र उचकी थांबत नसेल तर अस्वस्थता येते आणि माणूस बेचैन बनतो. अशावेळी गार दूध प्यावे. दुसरा उपाय नारळाची शेंडी जाळून केलेला धूर नाकात ओढावा अथवा कोणत्याही उपायाने शिंक काढावी. उचकी थांबते. यकृताला काही इजा झाल्याने उचकी लागत असेल तर मात्र ती या उपायाने थांबत नाही. अशावेळी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment