तब्बल 6 महिन्यानंतर ट्रॅकवर धावली मुंबई-पुणेकरांची लाडकी डेक्कन क्वीन


पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल 6 महिने ट्रॅकवर उभी असलेली मुंबई-पुणेकरांची डेक्कन क्वीन एक्सप्रेस शनिवारी पुणे रेल्वे स्थानकातून मुंबईकडे रवाना झाली. मुंबईतून ही गाडी शुक्रवारी पुण्यात दाखल झाली. ही गाडी लॉकडाऊनमुळे मागील सहा महिन्यांपासून यार्डातच उभी होती. दरम्यान, पहिलाच दिवस असल्याने प्रवाशांचा प्रतिसाद अत्यल्प असून केवळ २५० च्या जवळपास आरक्षण करण्यात आले होते.

ही गाडी लॉकडाऊननंतर सहा महिन्यांनी धावणार असल्यामुळे प्रवाशांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. त्याचप्रमाणे मध्य रेल्वेकडून इंद्रायणी एक्सप्रेसही सोडण्यात येणार आहे. शुक्रवारी रात्री डेक्कन क्वीन पुणे स्थानकात दाखल झाली. ही गाडी शनिवारी सकाळी नियमित वेळेत मुंबईकडे रवाना झाली. तत्पुर्वी रेल्वे प्रवासी ग्रुप, रेल्वे अधिकारी व प्रवाशांकडून गाडीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते.

दरम्यान, मुंबईतून आलेल्या डेक्कन क्वीनला पहिलाच दिवस असल्याने अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला. केवळ १८७ प्रवाशांनी आरक्षण केले होते. तसेच शनिवारी मुंबईला जाणाऱ्या गाडीलाही फारसा प्रतिसाद नाही. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत जवळपास २०० प्रवाशांनीच आरक्षण केले होते. मुंबईला पुण्यातून सायंकाळी गेलेल्या इंद्रायणी एक्सप्रेसलाही केवळ २४० प्रवाशांनीच आरक्षण केले होते. या दोन्ही गाड्यांचे प्रवासी क्षमता प्रत्येकी १४५० एवढी आहे.