न्यायाधीश पदी नेमणूक होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल


उत्तर प्रदेशमधील काही न्यायाधिशांनी, ‘आपले नाव अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून सुचवले जात नसल्याची तक्रार करून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयाचे महासचिव यांना नोटीस बजावली आहे.

खंडपीठाने ही याचिका दाखल करून घेतली. मात्र, सरन्यायाधीश बोबडे यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली. मला न्यायाधीश करा म्हणून कोणी याचिका दाखल करण्याची ही पहिलीच वेळ आहे. मला उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्याची इच्छा आहे म्हणून तसे करा, असे सांगण्याने कोणी तशी निवड करत नसते, अशा शब्दात न्या. बोबडे यांनी याचिकाकर्त्यांना फटकारले.