संयुक्त राष्ट्रांच्या डब्ल्यूएफपी या संस्थेला यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार


नवी दिल्ली – संयुक्त राष्ट्रांच्या वर्ल्ड फूड प्रोग्राम (डब्ल्यूएफपी) या संस्थेला सन २०२० चे शांततेचे नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. नॉर्वेतील ऑस्लो येथील समितीने जगभरामध्ये तवाणपूर्ण आणि युद्धजन्य परिस्थिती असणाऱ्या प्रदेशांमध्ये अन्न पुरवठा करण्याचे आणि तेथे शांततेसाठी काम करणाऱ्या डब्ल्यूएफपीच्या नावाची घोषणा केली आहे. शांततेचे नोबेल पारितोषिक देण्यास १९०१ पासून सुरूवात झाली व नॉर्वे संसदेने नेमलेल्या समितीच्या निवडीनुसार ते दिले जात आहे. डब्ल्यूएफपी मागील पाच दशकांहून अधिक काळापासून जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये कोणीही उपाशी झोपू नये म्हणजेच झीरो हंगर या मोहिमेसाठी काम करत आहे.


नोबेलच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. २०२० चा नोबेल शांतता पुरस्कार हा वर्ल्ड फूड प्रोग्रामला (डब्ल्यूएफपी) देण्याचा निर्णय नॉर्वेमधील समितीने घेतला असल्याचे या ट्विटमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यांना हा पुरस्कार भूकेवरुद्ध डब्ल्यूएफपीने सुरु केलेल्या लढाईसाठी, तणाव आणि अशांतता असणाऱ्या प्रदेशांमध्ये शांततेसाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना आणि भूक हे वाद आणि संघर्षाचे कारण होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यासंदर्भात केलेल्या कामासाठी प्रदान करण्यात येत असल्याचे नॉर्वेमधील समितीने पुरस्कार देताना स्पष्ट केले आहे.