आता झोमॅटोवर ‘बाबा का ढाबा’


सोशल मीडियाच्या माध्यमातून, रातोरात स्टार बनलेल्या ‘बाबा का ढाबा’च्या खाद्यपदार्थांची मागणी आता दिल्लीकर घरबसल्या देखील करु शकणार आहेत. ‘बाबा का ढाबा’ आता झोमॅटोवर देखील लिस्टेड झाला आहे. अशा परिस्थितीत लोक जेव्हा आपल्याला पाहिजे, तेव्हा ‘बाबा का ढाबा’वर ऑर्डर देऊन आपले जिभेचे चोचले पुरवू शकतात. यासंदर्भात झोमॅटोने ट्विट करत सांगितले की, ‘बाबा का ढाबा’ आता झोमॅटोवर लिस्टेड झाला आहे. आमची टीम वृद्ध जोडप्यांसमवेत तेथे काम करत आहे, जेणेकरुन त्यांना जेवण करता येईल.

बुधवारी एका वृद्ध दाम्पत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये एका वयोवृद्ध जोडप्याने सांगितले की ते मालवीय नगरमध्ये ढाबा चालवतात. पण काम नसल्यामुळ ते वयोवृद्ध गृहस्थ रडले. वृद्धांचे अश्रू पाहून लोक हतबल झाले आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
अनेकांनी सोशल मीडियावर बाबांच्या ढाब्यावर पोहोचण्याची विनंती केली. त्याचा परिणाम गुरुवारी दिसून आला. बाबांच्या समर्थनार्थ दिल्लीहून मोठ्या संख्येने लोक ढाब्यावर पोहोचले. यामुळे आता वृद्ध जोडप्याच्या चेहऱ्यावर हसू परत आले आहे.


सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आम आदमी पक्षाचे आमदार सोमनाथ भारतीही बाबांच्या ढाब्यावर पोहोचले. त्यांनी वृद्ध जोडप्यास आश्वासन दिले की सरकार त्यांची काळजी घेईल.


बॉलिवूड अभिनेता रणदीप हूड्डानेही हा व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, जर तुम्ही दिल्लीत असाल तर बाबांच्या ढाब्यावर नक्की जा आणि त्यांचे मनोबल वाढवा.


बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन हिने देखील हा व्हिडिओ शेअर केला आहे आणि लिहिले आहे की जर तुम्ही तिथे गेलात तर तुमचा फोटो माझ्याबरोबर शेअर करा. मी आपला फोटो एका संदेशासह पोस्ट करेन.

कोण आहे ‘बाबा का ढाबा’ चालवणारे वयस्कर जोडपे ?
‘बाबा का ढाबा’ चालवणाऱ्या वयस्कर व्यक्तींचे नाव कांता प्रसाद आणि त्यांच्या पत्नीचे नाव बदामी देवी आहे. वयोवृद्ध जोडपे अनेक वर्षांपासून मालवीय नगरमध्ये स्वतःचे छोटे दुकान चालवतात. कांता प्रसाद म्हणाले की त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. पण तिघांपैकी कोणीही त्यांना मदत केली नाही. ते सर्व कामे स्वत: करतात आणि एकट्याने ढाबा देखील चालवतात.

कांता प्रसाद आणि त्यांची पत्नी दोघे मिळून सर्व काम करतात. कांता प्रसाद सकाळी 6 वाजता पोहचतात आणि रात्री 9 वाजेपर्यंत पूर्ण जेवण तयार करतात. लॉकडाऊन होण्यापूर्वी त्यांचे काम व्यवस्थित चालू होते. परंतु लॉकडाऊननंतर त्यांचे काम कमी झाले.