अनुप जलोटा-जसलीनच्या लग्नाचा फोटो पाहून नेटकरी अवाक्


सध्या सोशल मीडियावर ‘बिग बॉस’च्या बाराव्या सिझनमध्ये सहभागी झालेले स्पर्धक जसलीन मथारू व अनुप जलोटा यांची जोरदार चर्चा होत आहे. कारण आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गायिका जसलीनने अनुप जलोटा यांच्यासोबतचे काही फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो पाहून नेटकऱ्यांना या दोघांनी लग्न केले की काय असाच प्रश्न पडला आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये जसलीनने फक्त अनुप यांना टॅग केल्यामुळे या दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे.


या फोटोमध्ये जसलीन गुलाबी रंगाचा लेहंगा व भरजरी दागिने सुद्धा घातलेले दिसत आहेत, त्याचबरोबर तिच्या हातात लाल रंगाच्या बांगड्या दिसत आहे. तर भजनसम्राट म्हणून ओळखले जाणारे अनुप जलोटा हे तिच्या बाजूला शेरवानी, शाल आणि पगडी या वेशभूषेत पाहायला मिळत आहेत. नेटकऱ्यांनी या फोटोवर अक्षरश: प्रश्नांचा भडीमार केला आहे.

जसलीन आणि अनुप जलोटा ‘बिग बॉस १२’मध्ये एकत्र दाखल झाले, या दोघांविषयी तेव्हापासूनच जोरदार चर्चा सुरू झाली होती. पण आमच्यात फक्त गुरू-शिष्याचे नाते असल्याचे दोघांनी स्पष्ट केले. जसलीनने जुलै महिन्यात भोपाळमधील एका डॉक्टरच्या प्रेमात असल्याचा खुलासा केल्यामुळे आता तिने सोशल मीडियावर पोस्ट केलेले हे फोटो हा पब्लिसिटी स्टंट तर नसावा ना, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.