नाशिकमधून पाकिस्तानच्या आयएसआयला माहिती पुरवणाऱ्याला अटक


नाशिक – नाशिकमधून पाकिस्तानच्या आयएसआयला माहिती पुरवणाऱ्याला अटक करण्यात आली असून या व्यक्ती बाबत गोपनीय माहिती नाशिकच्या दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. ही व्यक्ती एचएएल अर्थात हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड या विमानं तयार करणाऱ्या कंपनीविषयीची संवेदनशील माहिती पुरवत होता. ज्याला अटक करण्यात आली आहे तो हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनीत कर्मचारी होता.

पाकिस्तानच्या आय. एस. आय. गुप्तहेर संघटनेच्या संपर्कात असून भारतीय बनावटीच्या विमानांची, विमानांच्या संवेदनशील तांत्रिक तपशीलाची, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड या नाशिक येथील विमान कारखान्याची तसेच कारखाना परिसरातल्या प्रतिबंधित क्षेत्राची गोपनीय माहिती हा कर्मचारी पाकिस्तानच्या आयएसआयला पुरवत होता. या कर्मचाऱ्याला त्यावरुन अटक करण्यात आली आहे. तीन मोबाइल्स, ५ सीमकार्ड आणि दोन मेमरी कार्ड्स त्याच्याकडून जप्त करण्यात आली आहेत. हे सगळे साहित्य फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये पाठवण्यात आले आहे.

गुणवत्ता- नियंत्रण विभागात संशयित कर्मचारी कार्यरत होता. त्याची प्रक्रिया विभागात काही महिन्यांपूर्वी बदली करण्यात आली होती. त्याने व्यवस्थापनाच्या या निर्णयाविरोधात आंदोलन केले होते. या कर्मचाऱ्याविरोधात एचएएल या कंपनीच्या कलम ३, ४ आणि ५ शासकीय गुपिते अधिनियम, १९२३ अन्वये दाखल करण्यात आला आहे. या आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.