गुप्तेश्वर पांडेच्या जागी निवृत्त कॉन्स्टेबलला दिले भाजपने तिकीट


पाटना – अभिनेता सुशांत सिंह राजपुतप्रकरणात महाराष्ट्राची बदनामी करणारे त्याचबरोबर बिहार विधानसभा निवडणुकीच्या आधी स्वेच्छानिवृत्ती घेवून जदयूमध्ये प्रवेश करणाऱ्या बिहारच्या माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांच्या पदरी निराशा पडली आहे. जदयूने पांडे यांना उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांना भाजपकडून उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा होती. पण त्यांच्या जागी भाजपने दुसराच उमेदवार घोषित केल्यामुळे पांडे यांची घोर निराशा झाली.

बक्सर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास गुप्तेश्वर पांडे इच्छुक होते. पण तिथे भाजपने एका बिहारच्या निवृत्त पोलीस हवालदाराला उमेदवारी दिली आहे. माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांना मागे टाकत बक्सरमधील भाजपचे उमेदवार परशुराम चतुर्वेदी यांनी ही उमेदवारी मिळवल्याची चर्चा सुरू आहे.

माझ्या मोठ्या भावासारखे गुप्तेश्वर पांडे हे असून त्यांच्या आदरपूर्वक मी पाया पडतो आणि त्यांच्याबद्दल माझ्या मनात आपुलकीशिवाय काहीच नसल्याचे चतुर्वेदी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच त्यांनी भाजपचे उमेदवारी दिल्याबद्दल आभार देखील मानले. चतुर्वेदी यांनी बिहार पोलिसात असताना सीआयडीसह अनेक विभागात काम केले आहे. मी काम केलेल्या प्रत्येक ठिकाणी माझा आदर होता. कामाच्या ठिकाणी मी खूप मेहनती व प्रामाणिक होतो. या अनुभवांमुळे मला राजकारणात मदत मिळाल्याचे चतुर्वेदी म्हणाले.