
नवी दिल्ली : सध्या कोरोनाचे संकट संपूर्ण जगभरावर घोंघावत असल्यामुळे जगभरातील नागरिक कोरोना व्हायरसवरील प्रभावी लसीची वाट पाहत आहेत. कोरोनावर प्रभावी लस तयार करण्यासाठी जगभरातील अनेक देशांतील संशोधकही प्रयत्न करत आहेत. अशातच जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच, WHOने जारी केलेल्या एका वक्तव्यामुळे आशेचा किरण दिसला आहे. WHO च्या वतीने कोरोनावरील प्रभावी लस या वर्षाअखेरपर्यंत तयार होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.
WHOकडून आली आनंदाची बातमी; वर्षाअखेरपर्यंत तयार होऊ शकते कोरोनावर प्रभावी लस
कोरोना महामारीसंदर्भात सुरु असलेल्या एका बैठकीत बोलताना डब्लूएचओचे अध्यक्ष टेड्रोस एडहानॉम यांनी सांगितले की, आम्हाला आशा आहे की, संपूर्ण जग ज्या व्हॅक्सिनची वाट पाहत आहे, या वर्षाअखेरपर्यंत ते व्हॅक्सिन तयार होणार आहे. तसेच त्यांनी दावा न करता अशी आशा असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, डब्लूएचओच्या नेतृत्त्वात येणारी COVAX ग्लोबल व्हॅक्सिनच्या जवळपास 9 प्रकारच्या व्हॅक्सिनवर काम सुरु आहे. ज्या चाचण्यांमधून त्यांचे परिणाम चांगले दिसून येत असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच व्हॅक्सिनचे परिणाम असेच येत राहिले तर यावर्षाअखेरपर्यंत कोरोनावरील प्रभावी लस लोकांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात होईल, अशी आशा डब्लूएचओने व्यक्त केली आहे.
