एकट्याने बोगद्यात हात हलवणे सोडा आणि आपले मौन तोडा पंतप्रधानजी; राहुल गांधी


नवी दिल्ली – काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल टनेलचे उद्घाटन केले. भारताची सीमेवरील शक्ती हिमाचल प्रदेशातील रोहतांग खिंडीत खोदण्यात आलेल्या अटल बोगद्यामुळे वाढेल, असे प्रतिपादन या बोगद्याचे उद्घाटन करताना मोदींनी केले. या बोगद्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी मोदींनी बोगद्यात गेल्यानंतर नेहमीप्रमाणे हात उंचावून अभिवादन केले. पण कुणीही बोगद्यात नसताना मोदींनी नेमके अभिवादन कोणाला केले? असा सवाल राजकीय नेत्यांसह अनेकांनी विचारला आहे. सोशल मीडियावर मोदींचा हात दाखवतानाचा फोटो शेअर करत अनेकांनी निशाणा साधला आहे.


यावरून आता पंतप्रधान मोदींवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देखील टीकास्त्र सोडले आहे. राहुल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट करून पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. पंतप्रधानजी एकट्याने बोगद्यात हात हलवणे सोडा आणि आपले मौन तोडा, देशवासियांच्या प्रश्नांना सामोरे जा, देश तुम्हाला खूप काही विचारत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. आपल्या भाषणाचा एक व्हिडीओ देखील राहुल यांनी शेअर केला आहे. नरेंद्र मोदींवर विविध मुद्यांवरून व्हिडीओमध्ये त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.