यामुळे फेसबुकने डिलीट केली डोनाल्ड ट्रम्प यांची पोस्ट


वॉशिंग्टन : सोशल मीडियात अग्रेसर असलेल्या फेसबुककडून अनेकदा धोकादायक किंवा हिंसक पोस्ट डिलीट केल्या जातात. सध्या अमेरिकेत निवडणुकीचे वारे वाहात असतानाच फेसबुकने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पोस्ट डिलीट केल्यामुळे खळबळ उडाली आहे. फेसबुकने कारवाई करत ट्रम्प यांची पोस्ट डिलीट केली. कोरोनाबाबत एक पोस्ट डोनाल्ड ट्रम्प यांनी लिहिली होती, पण फेसबुकने ही पोस्ट हटवल्याची माहिती मिळाली आहे.

प्लू पेक्षा कोरोना कमी धोकादायक असल्याचा दावा स्वत: कोरोनाशी लढत असलेल्या ट्रम्प यांनी पोस्टमध्ये केला होता. या संदर्भात त्यांनी ट्वीट देखील केले होते. ट्विटरकडून अनेक वेळा या पोस्टबाबत हा दावा खोटा असल्याचे सांगण्यात आले आहे. तर फेसबुकने चक्क डोनाल्ड ट्रम्प यांची फेसबुक पोस्टच हटवली आहे.

कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर तीन दिवस डोनाल्ड ट्रम्प यांना प्रकृती बिघडल्यामुळे आर्मी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर आता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून सध्या त्यांना व्हाइट हाऊसमध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे.

यासंदर्भात सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार या ट्विटमध्ये ट्रम्प यांनी म्हटले होते, फ्लू सोबत जगायला अमेरिकेतील नागरिक शिकले आहेत. त्याचबरोबर आता कोरोनासोबत जगणेही शिकत आहोत. कोरोना फ्लूच्या तुलनेत कमी धोकादायक असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. या पोस्टनंतर ट्विटरने ही पोस्ट हाइड केली, असून संभ्रम निर्माण करणारी असल्याचा दावा केला तर फेसबुकने ही पोस्टच डिलीट केली आहे.