सीबीआयने मान्य केला एम्सचा सुशांत सिंहची आत्महत्याच असल्याचा अहवाल!


मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणामध्ये काही घातपाताचा प्रकार होता याविषयी सीबीआयकडून तपास केला जात होता. एम्सने याप्रकरणी त्यांच्या अहवालात सुशांतने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. मीडिया अहवालाच्या मते आता सुशांतने आत्महत्याच केली होती, असे सीबीआयने देखील हे मान्य केले आहे. त्यादिवशी नेमके काय घडले हा सीन सीबीआयने अनेकदा रिक्रेएट केला आणि त्यानंतर या निर्णयावर ते पोहोचले आहेत की अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्याच केली आहे. यासंदर्भातील वृत्त अमर उजालाने दिले आहे.

पुन्हा एकदा याप्रकरणाची खात्री करून घेण्यासाठी एम्सकडून याप्रकरणात दुसऱ्यांदा तपास करण्यास सीबीआयने सांगितले होते. एम्सच्या अहवालानुसार सुशांतने विष खाल्ले असावे असा कोणताही पुरावा मिळाला नाही आहे. त्याप्रमाणे ही घटना घातपाताचा प्रकार असावा याबाबतही कोणताही पुरावा मिळाला नाही आहे. त्याच्या शरीरावर ना कोणतीही जखम आढळली आहे ना ही त्याठिकाणी कुणी जबरदस्तीने शिरल्याचा पुरावा आहे.

सीबीआय सूत्रांच्या मते सीबीआयने याप्रकरणात 24 हून अधिक जणांची चौकशी केली आहे. यामध्ये त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती, रियाचे आई-वडील, सुशांतच्या घरचे सदस्य, त्याचा स्टाफ, मॅनेजर आणि इतर काही बड्या व्यक्तींच्या नावाची चौकशी झाली आहे. याप्रकरणी एम्सच्या फॉरेन्सिक डॉक्टरांची टीम तपास करत होती. या टीमचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी असे म्हटले की, आमचा अंतिम अहवाल आम्ही दिला आहे. गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे हे प्रकरण आहे. गळफासाच्या निशाणाशिवाय कोणत्याही खुणा त्याच्या शरीरावर नाही आहेत. त्याच्या शरीरावर आणि कपड्यावर देखील झटापटीच्या खुणा नाही आहेत.