उदयनराजेंची मराठा आरक्षणाच्या बैठकीला दांडी!


मुंबई : नवी मुंबईतील माथाडी भवनात आज मराठा आरक्षणासाठी होत असलेल्या बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागून होत्या. कारण पहिल्यांदाच मराठा आरक्षणच्या मुद्द्यावर उदयनराजे आणि संभाजीराजे एकत्र येणार होते. पण खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे आजच्या या महत्त्वाच्या बैठकीला येणार नसल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबई येथे माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी बोलावलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीकडे उदयनराजे यांनी पाठ फिरवली आहे.

त्याचबरोबर मराठ्यांच्या राजधानीतून लवकरच मराठा क्रांती मोर्चाची राज्यव्यापी बैठक होणार असून स्वतः उदयनराजे साताऱ्यात होणाऱ्या या बैठकीचे नेतृत्व करणार असल्याची माहिती समोर येत आहे. खरंतर, सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थिगिती मिळाल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. अशात राज्यात होणारी एमपीएससी परीक्षेला तूर्तास स्थगिती द्यावी आणि पोलीस भरतीदेखील थांबवावी अशी मागणी जोर धरत आहे. राज्यभरात या मागण्यांसाठी मराठा समाजाच्या बैठका होत आहेत. नवी मुंबईत बुधवारी माथाडी समाजाची बैठक होणार आहे. छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती उदयनराजे या बैठकीला उपस्थित राहणार होते. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष या बैठकीकडे होते. पण आता उदयनराजे यांनी बैठकीकडे पाठ फिरवल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.