भारत बायोटेक कोवॅक्सिन लस अधिक प्रभावी बनवण्यासाठी करणार ‘या’ औषधाचा वापर


नवी दिल्ली – देशावर ओढावलेले कोरोनाचे संकट अजूनच गडद होत असतानाच कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशात कोरोना प्रतिबंधक लस विकसित करण्यात येत आहे. कोरोनावरील लस विकसित करत असलेल्या भारत बायोटेकच्या लसीची सध्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू असतानाच एक महत्त्वाची माहिती भारत बायोटेकने दिली आहे. भारत बायोटेक कोवॅक्सिन या लसीत एक असे औषध वापरणार आहे, ज्यामुळे प्रतिकारक शक्ती अधिक आणि मोठ्या कालावधीसाठी वाढणार आहे.

भारत बायोटेक Alhydroxiquim-II या औषधाचा आपल्या कोवॅक्सिन या लसीत वापर करणार आहे. Alhydroxiquim-II सहाय्यक म्हणून काम करणार असून त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती अधिक वाढणार आहे. सध्या या लसीची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. तसेच या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणीही लवकरच सुरू केली जाणार आहे. लखनऊ आणि गोरखपूरमध्ये ऑक्टोबर महिन्यापासून ‘कोवॅक्सिन’ची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु होणार असल्याचे उत्तर प्रदेश सरकारने यापूर्वीच जाहीर केले होते. लखनऊ, गोरखपूरमध्ये भारत बायोटेकने विकसित केलेल्या ‘कोवॅक्सिन’ लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी ऑक्टोबर महिन्यापासून सुरु होईल, अशी माहिती उत्तर प्रदेशचे प्रधान आरोग्य सचिव अमित मोहन प्रसाद यांनी यापूर्वी पत्रकार परिषदेदरम्यान दिली होती.

अशा सहाय्यक घटकांची सध्या गरज आहे, जे अधिक अँटीबॉडी रिस्पॉन्स तयार करू शकतात. यामुळे अधिक काळासाठी पॅथोजिंसपासून सुरक्षा मिळणार आहे. व्हायरोवॅक्ससोबत आमची भागीदारी ही भारत बायोटेकच्या सुरक्षित आणि प्रभावी लस विकसित करण्याचा परिणाम आहे. अधिक काळासाठी रोग प्रतिकारक शक्ती मिळावी यासाठी काम केले जात असल्याची माहिती भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णा एल्ला यांनी सांगितले.