महाविकासआघाडी नावाच्या सर्कशीतील अनिल देशमुख हे एक जोकर


मुंबई – सुशांत सिंह प्रकरणावरुन विरोधकांवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना निशाणा साधत महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांनी माफी मागावी, त्याचबरोबर बदनामी करणाऱ्यांना जनता माफ करणार नसल्याचे म्हटले. आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी त्यांच्या या टीकेला उत्तर देत अनिल देशमुख महाविकासआघाडी नावाच्या सर्कशीतील जोकर, असल्याचा टोला लगावला आहे.


याबाबत अतुल भातखळकर यांनी एक ट्विट केले असून ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, गृहमंत्री अनिल देशमुख हे राज्यात सुरू असलेल्या महाविकासआघाडी नावाच्या सर्कशीतले जोकर आहेत. याआधी भाजप सरकारवर केलेले फोन टॅपिंगचे आरोप ते सिद्ध करू शकले नाहीत. आता सुशांतप्रकरणी त्यांनी बोगस अकाउंटचा आरोप केला आहे. आरोप सिद्ध करा नाही तर जनतेची माफी मागून तोंड काळे करा.

भाजपवर नेहमीप्रमाणे अनिल देशमुख यांनी खोटे राजकीय आरोप केले आहे. भाजप या खोट्या आरोपांबद्दल तीव्र निषेध करते. जी चौकशी करायची आहे ती करा, भाजप किंवा देवेंद्र फडणवीस कधीच आणि कोणतेही बेकायदेशीर काम करत नसल्याचेही यावेळी अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे. एवढे राजकीय गृहमंत्री इतिहासात राज्याने कधीच पाहिले नसल्याची टीकाही त्यांनी केली आहे.