वैद्यकशास्त्रातील यंदाचा नोबेल पुरस्कार हार्वे अल्टर, मायकल ह्यूटन आणि चार्ल्स राईस यांना जाहीर


नवी दिल्ली – वैद्यकशास्त्रातील यंदाचा (२०२०) नोबेल पुरस्कार हार्वे जे. अल्टर, मायकल ह्यूटन आणि चार्ल्स एम. राईस यांना जाहीर झाला असून ‘हिपॅटायटिस सी’ या विषाणूच्या शोधासाठी या तिघांना या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. सोमवारी याची घोषणा नोबेल पुरस्कार समितीने केली आहे.

सिरोसिस आणि यकृताच्या कर्करोगासारखे आजार रक्तातील ‘हिपॅटायटिस सी’ या विषाणूमुळे होतात. या आजारांसी लढा देण्यासाठी या तिन्ही वैज्ञानिकांनी निर्णायक योगदान दिले आहे. नोबेल समितीने हा पुरस्कार जाहीर करताना म्हटले की, हिपॅटायटीस सी विषाणूंमुळे होणारे आजार या वैज्ञानिकांच्या योगदानामुळे इतिहासात आता बरे होऊ शकतात. मानवजातीसाठी वरदान ठरलेल्या या संशोधनामुळे यासंबंधीच्या आजारांसाठी संभाव्य रक्त चाचण्या करता येणे शक्य झाले तसेच लाखो लोकांचे जीवन वाचविणारी नवीन औषधेही तयार केली गेली.