नोटांमुळे कोरोनाचा संसर्ग होतो का ? या प्रश्नाला आरबीआयने दिले हे उत्तर


नवी दिल्ली : आपल्यापैकी अनेकजणांनी कोरोना या जीवघेण्या रोगाशी सामना केला असेल, पण याच दरम्यान चलनातील नोटांमुळे कोरोनाचा संसर्ग होतो का ? असा प्रश्न देखील आपल्यापैकी अनेकांच्या मनात निर्माण होत असेल. आता खुद्द भारतीय रिझर्व बँकेने या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. कोरोनाचा संसर्ग नोटांनी देखील होऊ शकते. व्यवहारात नोटांचा वापर केल्यामुळे कोरोना संक्रमण तुमच्या शरीरापर्यंत पोहोचू शकते, असे इंडस्ट्री बॉडी कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (CAIT) म्हटले आहे. कोरोना नोटांमुळे पसरण्याच्या वृत्ताला आरबीआयने देखील दुजोरा दिला आहे.

CAIT ने ९ मार्चला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांना चलनातील नोटा या बॅक्टेरीया आणि वायरसच्या वाहक आहेत का ? असा प्रश्न केला होता. आरबीआयला सरकारकडून यासंदर्भातील एक पत्र पाठवण्यात आले होते आणि यासंदर्भातील प्रश्नाला ३ ऑक्टोबरला उत्तर देण्यात आले. ईमेलच्या माध्यमातून दिलेल्या या उत्तरात नोटा या बॅक्टेरीया आणि व्हायरसच्या वाहक असू शकतात, असे म्हटले गेले आहे.

त्यामुळे यातून वाचण्यासाठी डिजिटल पेमेंट हा पर्याय असल्याचे आरबीआयने सुचवले आहे. मोबाईल आणि इंटरनेट बॅंकीग, क्रेडीट आणि डेबिट कार्डच्या माध्यमातून पेमेट असा सल्ला देखील देण्यात आला आहे. यामुळे रोख रक्कमेशी प्रत्यक्षात संपर्क कमी येईल. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका कमी होऊ शकतो, असे देखील आरबीआयने म्हटले आहे.

त्याचबरोबर आरबीआयने डिजीटल पेमेंट करणाऱ्यांना सवलत देण्याच्या योजनांचाही उल्लेख केला आहे. डिजिटल व्यवहार करणाऱ्या बँकांना सबसिडी द्यायला हवी. आरबीआयवर या सबसिडीचा आर्थिक बोजा नसेल. नोटांवर होणारा खर्च कमी होईल, असे CAIT चे राष्ट्रीय अध्यक्ष बीसी भरतिया आणि महासचिव प्रवीण खंडेलवाल यांनी म्हटले आहे.