एम्सच्या अहवालानंतर निलेश राणेंचा शिवसेनेवर हल्ला; अजून खूप काही बाकी आहे


मुंबई: केंद्रीय तपास यंत्रणेला (सीबीआय) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) न्यायवैद्यक विभागाने दिलेल्या अहवालात बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांचा मृत्यू हत्या नव्हे तर आत्महत्या असल्याचे स्पष्टपणे नमूद केल्याची माहिती समोर आली. सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केल्याचे या अहवालातून स्पष्ट झाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधला होता.

महाराष्ट्र सरकार व मुंबई पोलिसांना अगदी सुरुवातीपासूनच या प्रकरणात बदनाम करण्याचा कट रचला जात आहे. जर सीबीआय चौकशीवरही आता विश्वास ठेवला जात नसेल, तर आम्ही निशब्द आहोत. एम्स फॉरेन्सिक मेडिकल बोर्डाचे प्रमुख असलेल्या डॉ. सुधीर गुप्ता यांचा हा अहवाल असून शिवसेना व अन्य कोणत्या राजकीय पक्षाशी त्यांचे कोणतेही संबंध नाहीत, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. तसेच शिवसेना देखील एम्सच्या अहवालानंतर पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. पण याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.


याबाबत निलेश राणे यांनी एक ट्विट केले असून ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी AIIMSच्या अहवालानंतर शिवसेना उड्या मारायला लागली. त्यांना वाटते की केसचा निकाल लागला. सीबीआयचा रिपोर्ट अजून बाकी आहे. अजून खूप काय बाकी आहे एवढ्या लवकर डीजे वाजऊ नका.