वायुदल प्रमुखांचे मोठे वक्तव्य; भारताच्या क्षमतेसमोर चीनची हवाई शक्ती सरस ठरणार नाही


नवी दिल्ली – भारतीय वायु दल कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज असून सुरक्षेची स्थिती लक्षात घेऊन, सर्व आवश्यक भागांमध्ये मजबुतीने हवाई दल तैनात असल्याचे वायुदल प्रमुख आरकेएस भदौरिया यांनी म्हटले आहे. भदौरिया यांनी हे विधान पूर्व लडाख सीमेवर चीन बरोबर असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केले.

चीनची हवाई शक्ती भारताच्या क्षमतेसमोर सरस ठरणार नाही. पण त्याचवेळी शत्रूला कमी सुद्धा लेखणार नसल्याचे भदौरिया यांनी सांगिकले. येत्या आठ ऑक्टोंबरला असणाऱ्या वायुदल दिनाच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. जर परिस्थिती तशी उदभवलीच तर, उत्तर आणि पश्चिम सीमेवर एकाचवेळी दोन आघाड्यांवर युद्ध लढण्यास भारतीय वायु दल तयार असल्याचे वायुदल प्रमुखांनी सांगितले.

राफेलच्या समावेशामुळे पहिला आणि खोलवर हल्ला करण्याची क्षमता प्राप्त झाल्याचे देखील भदौरिया म्हणाले. पुढच्या तीन वर्षात राफेल आणि LCA मार्क १ तेजसची स्क्वाड्रन पूर्ण क्षमतेने कार्यरत होतील. हवाई दलाच्या सध्याच्या ताफ्यात आणखी मिग-२९ चा समावेश करण्यासाठी ऑर्डर देण्यात आल्याची माहिती भदौरिया यांनी दिली.