काँग्रेस नेते डी.के. शिवकुमार यांच्या मुंबई, दिल्लीसह १४ मालमत्तांवर सीबीआयची छापेमारी


मुंबई – सीबीआयने आज काँग्रेसचे कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार व त्यांचे बंधू डी.के. सुरेश यांच्या १५ पेक्षा अधिक मालमत्तांवर छापेमारी केली. सीबीआयकडून ही कारवाई शिवकुमार यांच्यावर करण्यात आलेल्या एका भ्रष्टाचार प्रकरणात करण्यात आली. सीबीआयने शिवकुमार यांच्या कर्नाटकासह मुंबई, दिल्ली येथील मालमत्तांवर धाडी टाकल्या. यात बंगळुरू ग्रामीणचे खासदार डी.के. सुरेश यांच्या घरांचीही सीबीआयकडून झाडाझडती घेण्यात आली.

सीबीआयने डी.के. शिवकुमार यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केलेला आहे. शिवकुमार यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी कर्नाटकातील नऊ, दिल्लीतील चार आणि मुंबईतील एक अशा शिवकुमार यांच्या १४ ठिकाणांवर आज सीबीआयने धाडी टाकल्या.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बंगळुरूतील सदाशिवनगरमधील डीके शिवकुमार यांच्या, तर खासदार डीके सुरेश यांच्या कनकपुरा आणि बंगळुरूमधील मालमत्तांवर सीबीआयच्या पथकांनी छापे टाकले. सकाळी सहा वाजता सीबीआय पोलीस अधीक्षक थॉमस जॉस यांच्या नेतृत्वाखालील पथकांनी धाडी टाकत झाडाझडती सुरू केली. रविवारी सायंकाळीच विशेष न्यायालयाकडून या कारवाईसंदर्भात सीबीआयने परवानगी मिळवली होती. सर्वच ठिकाणी सीबीआयची कारवाई सुरू असून, या कारवाईवर काँग्रेसने टीका केली आहे.

याप्रकरणी कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांनी टीका केली आहे. नेहमीच सूडाचे राजकारण भाजप करते आणि जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करते. सीबीआयकडून डीके शिवकुमार यांच्या घरांवर करण्यात आलेली छापेमारी पोटनिवडणुकीसाठी आम्ही केलेली तयारी निष्प्रभ ठरवण्याचा आणखी एक प्रयत्न असून त्याचा तीव्र निषेध करतो, असे सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे.