आर्थिक चणचण असेल तर या सोप्या पद्धतीने काढा PF मधून अ‍ॅडव्हान्स पैसे


नवी दिल्ली : संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट ओढावल्यामुळे प्रत्येक जणावर आर्थिक संकट ओढावले आहे. अशात केंद्र सरकारने कर्मचार्‍यांच्या पीएफ संदर्भात महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून आता आगाऊ रक्कम काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने काही कालावधीसाठी लॉकडाऊन आणि आर्थिक अडचणींमुळे ही सूट देण्यात आली आहे. केंद्र सरकारने नियम शिथिल केल्यानंतर ईपीएफओद्वारे कर्मचार्‍यांनाही याचा लाभ घेता येणार आहे.

दरम्यान ईपीएफओने जाहीर केलेल्या माहितीनुसार, 38,71,664 लोकांनी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून आतापर्यंत 44,054.72 रुपये काढले आहेत. यामध्ये कोविड -19 संबंधित क्लेम सुद्धा देण्यात आल्याची माहिती कामगारमंत्री संतोष गंगवार यांनी दिली आहे. विशेष म्हणजे फक्त महाराष्ट्रातूनच 25 मार्च ते 31 ऑगस्ट या कालावधीत 7,23,986 कर्मचार्‍यांनी सुमारे 8,968.45 कोटी रुपये काढले आहेत.

पीएफ खात्यातून 1 सप्टेंबरनंतर आगाऊ रक्कम काढण्यासाठी सरकारची सूट बंज झाल्यामुळे या योजनेंतर्गत तुम्ही पैसे काढू शकत नाही. पण असे असले तरी कर्मचार्‍यांना अजूनही त्यांच्या पीएफ खात्यातून पैसे काढण्याचा पर्याय आहे. यासाठी सरकारी योजना नाही तर पीएफ खात्यातून पैसे काढावे लागणार आहेत.

अशा पद्धतीने काढू पीएफ
1. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढण्यासाठी आधी तुम्हाला ईपीएफओच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन लॉगिन करावे लागेल्यानंतर UAN आणि पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करू शकता. यावेळी तुमचे पीएफ खाते आधारशी जोडलेले असले पाहिजे.

2. या पोर्टलवर लॉगिन केल्यानंतर Online Service वर क्लिक करा आणि Claim (Form-31, 19 & 10C) ला निवडा.

3. यानंतर तुम्हाला बँक अकाऊंट नंबर टाकून Verify वर क्लिक करा. पुढे Yes वर क्लिक करून Proceed For Online Claim असा पर्याय निवडा.

4. ऑनलाईन फंड काढण्यासाठी PF Advance (Form 31) निवडा. आता येथे तुम्हाला ही रक्कम का काढायची आहे, याचे कारण लिहावे लागेल आणि तुमचा पत्ता लिहावा लागेल.

5. पैसे काढण्यासाठी तुम्ही जे कारण सांगितले आहे, त्यासंबंधीची कागदपत्रे तुम्हाला स्कॅन करून जोडावी लागतील. ईपीएफओ अकाऊंटमधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला कंपनीचीही परवानगी घ्यावी लागेल.

6. कंपनीची परवानगी मिळाल्यानंतर तुमच्या बँकेमध्ये पैसे जमा होतील. यावेळी तुम्हाला रजिस्टर मोबाईल नंबरवर एक मेसेज मिळेल. बँकेत पैसे ट्रान्सफर होण्यासाठी काही ठराविक कालावधी लागतो.