सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणाखाली व्हावी हाथरस प्रकरणाची चौकशी; पीडितेच्या कुटुंबीयांची मागणी


नवी दिल्ली – आता सीबीआयकडे हाथरस येथील १९ वर्षीय दलित तरुणीवरील सामुहिक बलात्कार आणि मृत्यू प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला असला तरी सीबीआय चौकशीला पीडितेच्या कुटुंबियांनी विरोध दर्शवला असून सर्वोच्च न्यायालयाच्या निरिक्षणाखाली चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. आमचे काही प्रश्न अद्यापही अनुत्तरित असल्याचे पीडितेच्या भावाने म्हटले आहे.

हाथरस प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवत असल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी जाहीर केले. पण या प्रकरणी आधीच एसआयटीकडून तपास सुरु असताना आम्ही सीबीआय चौकशीची मागणी केली नसल्याचे पीडितेच्या भावाने एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले आहे.

पीडितेच्या भावाने म्हटले की, चौकशी कोण करत आहे याबाबत हरकत नाही. यामध्ये हाथरसच्या जिल्हादंडाधिकाऱ्यांवर कारवाई का करण्यात आली नाही? आमच्या कुटुंबासोबत कोणी गैरव्यवहार केला आणि आमच्या कुटुंबाला कोणी धमकावले? हे आमचे प्रश्न अद्यापही अनुत्तरितच आहेत. आम्हाला न्याय पाहिजे, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निरिक्षणाखाली आम्हाला चौकशी हवी आहे.