जगाच्या चीनवरील रागाचा भारताला फायदा- निर्यात वाढली

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी गुरुवारी देशाच्या निर्यातीत सतत सहा महिने सुरु असलेल्या घसरणीनंतर सप्टेंबर मध्ये ५.२७ टक्के वाढ नोंदविली गेल्याचे ट्विटरवर पोस्ट केले असून सप्टेंबर मध्ये देशाची निर्यात २७.४ अब्ज डॉलर्सवर गेली आहे. कोविड १९ पूर्वी गेल्या सप्टेंबर मध्ये हेच प्रमाण २६.०२ अब्ज होते. वाढलेली निर्यात ही देशाची अर्थव्यवस्था वेगाने रिकव्हर होत असल्याचा संकेत मानला जात आहे.

निर्यातदार संघटना फियोचे अध्यक्ष शरदकुमार सराफ यांच्या म्हणण्यानुसार करोनामुळे चीन विरोधी वातावरण जगभर निर्माण झाले असून जगभरातील देशांचा चीनवर राग आहे. याचा फायदा भारताला मिळाला आहे. पियुष गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार मेक इन इंडिया, मेक फॉर वर्ल्ड मोहिमेचा हा दृश्य परिणाम आहे.

कोविड १९ महामारीमुळे मार्च २०२० पासूनच जागतिक मागणी कमी होती. त्यामुळे निर्यात घसरत चालली होती. पेट्रोलियम, चामडे उत्पादने, अभियांत्रिकी साहित्य आणि मौल्यवान रत्ने, दागिने या क्षेत्रांना निर्यात घसरणीचा फटका अधिक बसला होता. भारतीय व्यापार संवर्धन परिषद (टीपीआयसी)चे अध्यक्ष मोहित सिंगला म्हणाले, आता आंतरराष्ट्रीय बाजार उघडू लागले आहेत आणि परदेशी ग्राहकांच्या ऑर्डर येऊ लागल्या आहेत. खाद्य, कृषी मालाची निर्यात पहिल्याप्रमाणेच राहील असा अंदाज त्यांनी यावेळी व्यक्त केला.