माझी जात ब्राह्मण असल्यामुळे मी टीकेचा धनी – देवेंद्र फडणवीस


मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगित दिली आहे. हा निर्णय मागच्या सरकारच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. सोबतच माझी जात ब्राह्मण असल्याने माझ्या माथी सर्व मारलं तर चालते असे काहीजणांना वाटत असून काही लोक तसा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.

एबीपी माझाशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जेव्हा तुम्ही लोकांना समजावू शकत नाही तेव्हा त्यांना गोंधळात टाका असा एक सिद्धांत आहे. मग कसंही करुन हे मागच्या सरकारच्या माथी कसं मारायचं सुरु होतं. दुर्दैवाने हे बोलणं मला शोभत नाही पण आज स्पष्टपणे सांगतो. काही बोटावर मोजण्याइतके लोक आहेत ज्यांना असं वाटतं की, माझी जात ब्राह्मण असल्याने माझ्या माथी सर्व मारलं तर चालतं. काहीजण असा प्रयत्न करतात. पण मराठा समाजाला आणि राज्यातील सर्वांना समाजाच्या हितासाठी मी काय केलं आहे हे माहिती आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या बातम्या परसवण्याचं काम करणारे यशस्वी होणार नाही.

मराठा समाजाचं नेतृत्व कोणी करावे याबाबत फडणवीस म्हणाले की, कोणी नेतृत्व करावं यासाठी छत्रपतींच्या घरात दोन भाग पडतायत अशी परिस्थिती असू नये. दोघांनी त्याचं नेतृत्व केलं पाहिजे. दोघंही समजूतदार असल्याने वाद होणार नाही आणि कोणी त्यासाठी प्रयत्न करु नये अशी हात जोडून विनंती आहे.