देशातील कोरोना ग्रस्तांचा आकडा दररोज 90 हजारांनी वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर आज केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राज्यसभेत देशात कोरोना प्रतिबंधक लस कधी उपलब्ध होईल याची माहिती दिली आहे. आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, पुढील वर्षाच्या सुरुवातीला देशातील लोकांसाठी कोरोनावरील लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
देशात कधीपर्यंत उपलब्ध होणार कोरोना लस ? केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिली माहिती
डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले की, भारत अन्य देशांप्रमाणेच प्रयत्न करत आहे. पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली एक तज्ञांचा ग्रुप याची देखरेख करत आहे व आपल्याकडे एडवांस प्लॅनिंग आहे. आम्हाला आशा आहे की पुढील वर्षाच्या सुरुवातीला भारतात लस उपलब्ध होईल.
त्यांनी माहिती दिली की, देशात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक कमी (1.64 टक्के) आहे. सरकारचे लक्ष्य मृत्यू दर कमी करून एक टक्क्यांपेक्षाही कमी करण्याचे आहे. भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 78 ते 79 टक्के आहे. त्यांनी सांगितले की, भलेही कोरोना रुग्णांची एकूण संख्या अधिक आहे. परंतू, हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 20 टक्क्यांपेक्षा कमी आहे.