विश्वास नांगरे पाटील नाशिक पोलीस आयुक्तपद सोडताना भावूक


नाशिक : नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील पदमुक्त होऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले. त्यांनी पदभार सोडताना नाशिकच्या जनतेसाठी ऑडिओ मेसेजच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या. नाशिकची सेवा करण्याची गेली दीड वर्ष संधी मिळाली, याबद्दल जनतेचे आभार व्यक्त करताना नांगरे पाटील काहीसे भावूक झाले.

नांगरे पाटील आपल्या ऑडिओ मेसेज म्हणतात, ‘नाशिककर नमस्कार, गेली दीड वर्ष आपली सेवा करण्याची संधी मला मिळाली. पोलीस आयुक्तपदाचा चार्ज दीपक पांडे यांच्याकडे आज देऊन मी मुंबईला सहआयुक्त म्हणून पदभार स्वीकारण्यासाठी रवाना होत आहे. या प्रगत, सुधारणावादी शहराची गेली दीड वर्ष सेवा करण्याची संधी मिळाली.

या शहराला पौराणिक, ऐतिहासिक असा ठेवा आहे. शिक्षण, शेती, उद्योग, पर्यटन अशा सगळ्या क्षेत्रात नाशिकची घोडदौड मोठ्या वेगाने सुरु आहे. येथे काम करताना येथील माती, येथील माणसे, येथील पाणी, येथील निसर्ग यांच्या प्रेमात माणूस पडतो. या आल्हाददायक, गोड शहराला सोडून जाताना निश्चित अंतःकरण जड आहे. पण हा ऋणानुबंध कायम राहील. आपल्या संपर्कात राहीन, आपले आशीर्वाद, प्रेम माझ्या पाठीशी राहील, अशी अपेक्षा करतो.

कोव्हिड संक्रमण काळ असो, निवडणुका किंवा सण-उत्सव, नाशिककर माझ्या पाठीशी कायम उभे राहिले. नाशिकची जनताच प्रगल्भ आहे, कायद्याचे पालन करणारी आहे. नाशिकरांच्या प्रगतीसाठी, सुरक्षिततेसाठी, आरोग्यासाठी सदैव सुयश चिंतितो. जय हिंद!’ -विश्वास नांगरे पाटील