काँग्रेसच्या नार्को टेस्टच्या मागणीला राम कदम यांचे प्रतिउत्तर


मुंबई – राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील भागीदार काँग्रेस आणि भाजप बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग प्रकरणावरुन आमनेसामने आल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. आमदार राम कदम यांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली होती. त्यावर सचिन सावंत यांना आमदार राम कदम यांनीही प्रतिआव्हान दिले आहे.

याबाबत आमदार राम कदम यांनी ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिले आहे की, छत्रपती शिवरायांना मानणारा मी मावळा आहे उद्या नव्हे ,या क्षणाला सांगाल त्या ठिकाणी मी यायला तयार आहे. मी व माझ्या संपूर्ण कुटुंबाची नार्को टेस्ट करावी. तयार आहे पण पण या प्रकरणात अडकलेले तुमच्या सरकारचे बडे नेते, मंत्री नार्को टेस्ट करायाला तयार आहेत का ? ते तपासून पहा असा टोला त्यांनी लगावला आहे.

तसेच सुशांत सिंग राजपूत प्रकरणात महाराष्ट्र सरकारचा बडे नेते अभिनेते आणि ड्रग माफिया यांना वाचवण्याचा प्रयत्न संपूर्ण देश दुनियाने पाहिला. या कालखंडात आक्रमकपणे सुशांतला न्याय मिळावा म्हणून आम्हा सर्वांची प्रामाणिक धडपड संपूर्ण देशाने पाहिली हेच सरकारच्या जिव्हारी लागले, असेही आमदार राम कदम यांनी आरोप केला आहे.

तत्पूर्वी काँग्रेस प्रवक्त सचिन सावंत यांनी ट्विट करत विवेक मोईत्रा यांच्यापासून राम कदम यांना ड्रग विक्री पुरवठ्याबाबत माहिती आहे. त्यांचे बॉलिवूड संबंधही घनिष्ठ असल्यामुळे त्यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी आम्ही करत आहोत. भाजप कार्यालयात ५३ वेळा फोन करून संदीप सिंग कोणाशी बोलत होता व भाजपचे ड्रग माफिया संबंध ही उघड होतील.

महाराष्ट्र ही शिवरायांची भूमी आहे. भाजप महाराष्ट्राचा सातत्याने जाणिवपूर्वक अपमान करत आहे. भाजपने अद्यापही कंगनाचा निषेध केला नाही. कंगना व राम कदम यांचे बोलविते धनी असलेल्या देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्रद्रोही भाजपने विनाशर्त महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी ही आमची मागणी आहे.

कंगना टीम म्हणजे “कंगना+भाजप IT सेल” कंगनाच्या ट्विट, वक्तव्यांमागे भाजप आहे. राम कदम यांनी या कृतघ्न महिलेच्या साथीने महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेचा, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील १०६ हुतात्म्यांचा, राणी लक्ष्मीबाईंचा व मुंबईवर प्रेम करणा-या सर्वांचा घोर अपमान केल्याचा आरोप सचिन सावंत यांनी केला होता.