भारतात पुन्हा घुसखोरीच्या तयारीत टीक-टॉक! ‘या’ दोन कंपन्यांशी सुरु आहे चर्चा


नवी दिल्ली – केंद्र सरकारने बंदी घातलेल्या चायनीज मोबाईलमध्ये अग्रेसर असलेल्या टीक-टॉकला (TikTok) पुन्हा एकदा भारतात प्रवेश करायचा आहे. कंपनीचे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून त्यातच आता जपानी कंपनी सॉफ्टबँक टीक-टॉकची भारतातील मालमत्ता आणि व्यावसायिक हक्क खरेदीची तयारी करत आहे. कंपनीला या करिता एका भारतीय कंपनीची भागीदारी आवश्यक असून त्यादृष्टीने या कंपनीचे प्रयत्न सुरू आहेत. याआधी रिलायन्स जिओसोबत टीक-टॉकची बोलणी सुरू असल्याचे बोलले जात होते. पण आता यात आणखी एका कंपनीचे नाव जोडले गेले असून ही कंपनी म्हणजे भारती एअरटेल.

टीक-टॉकसहित 58 चिनी अॅप्सवर जुलैमध्ये केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा आणि गोपनीयतेच्या कारणावरून बंदी घातली. चीनी सरकारबरोबर युझर्सचा डेटा ही कंपनी शेअर करत असल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. टीक-टॉकवर बंदीसाठी अमेरिकेतही पाऊल उचलण्यात आली आणि तिथे देखील बर्‍याच टेक कंपन्याही त्यांचा व्यवसाय खरेदी करण्याचा प्रयत्न करत असून सध्या या कंपन्यांमध्ये चर्चा सुरू आहे.

टीक-टॉकची मुख्यकंपनी (पॅरेंट कंपनी) बाइटडान्समध्ये आधीपासूनच जपानी कंपनी सॉफ्टबँकची भागीदारी आहे. ब्लूमबर्गच्या मते, टीक-टॉकचा देशातील व्यवसाय खरेदी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत आणि रिलायन्स जिओ इन्फोकॉम आणि भारती एअरटेलसोबत भागीदारी करण्यासाठी देखील चर्चा सुरू आहे. पण यावर भाष्य करण्यास जिओ आणि भारती एअरटेलने नकार दिला आहे. त्याचबरोबर सॉफ्टबँक देखील इतर पर्यायही शोधत आहे.

ओला कॅब, स्नॅपडील, ओयो रूम्स सारख्या अनेक स्टार्टअप्समध्ये जपानी कंपनी सॉफ्टबँकने गुंतवणूक केली आहे. ऑगस्टच्या सुरुवातीला अशी चर्चा देखील सुरू झाली की टीक-टॉकचा भारतातील व्यवसाय रिलायन्स खरेदी करू शकेल. मात्र त्यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.