सोनू सूदनेही आवळला कंगनाविरोधात राग


अभिनेत्री कंगना राणावत गेल्या अनेक दिवसांपासून सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यु प्रकरणामुळे वारंवार टीका करत असल्यामुळे चर्चेत आहे. याच दरम्यान, मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा कंगना राणावत हिने दिल्यामुळे आता सोशल मीडियावर तिच्यावर टीकेचा भडिमार सुरु झाला आहे. आता बॉलिवूड अभिनेता आणि लॉकडाऊनच्या काळात स्थालंतरित मजुरांसाठी देवदूत ठरलेला सोनू सूद यानेही या वादात उडी घेतली आहे.

त्याने जरी कंगनाच्या नावाचा उल्लेख केला नसला तरी त्याच्या टीकेचा रोख कंगनाकडे होत, हे त्याच्या ट्विटवरुन स्पष्ट होत आहे. ‘मुंबई… हे शहर नशीब बदलते, सलाम कराल तर सलामी मिळेल’ अशा शब्दात त्याने आपले मत व्यक्त केले आहे.

सुशांत सिंह राजपूत मृत्युप्रकरणावर सातत्याने मत मांडणाऱ्या कंगनाने काही दिवसांपूर्वी चित्रपट माफियांपेक्षा आता मला मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटत असल्याचे म्हणत मुंबई पोलिसांची सुरक्षा घ्यायला नकार दिला होता. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी कंगनाने महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलेल्या टीकेवरून तिला सुनावले होते. त्यानंतर कंगनाने एक ट्विट करत शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला धमकी दिली आणि पुन्हा मुंबईत परतू नये असे म्हटले. यापूर्वी मुंबईच्या रस्त्यांवर स्वातंत्र्याच्या घोषणा देण्यात आल्या. आता उघडपणे धमक्या मिळत आहेत. ही मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत असल्याचे असे कंगना म्हणाली होती.