आता मनसे देखील कंगनाविरोधात आक्रमक


मुंबई – सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणात सातत्याने टीका करत असल्यामुळे अभिनेत्री कंगना राणावत सध्या सगळ्याच माध्यमांमध्ये चर्चेत आहे. दरम्यान पाकव्याप्त काश्मीरशी मुंबईची तुलना केल्यामुळे कंगना राणावतविरोधात सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. कंगनाच्या या वक्तव्याचा बॉलिवूडसह मराठी सेलिब्रेटींनीही विरोध केला आहे.

तर कंगनाच्या वक्तव्यावर दुसरीकडे मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीही प्रतिक्रिया दिली असून माझ्या मुंबई पोलिसांबद्दल ‘जजमेंटल’ होऊन कुणीही ‘पंगा’ घेऊ नये, असे म्हटले आहे. याला आता धमकी समजा किंवा सल्ला, पण माझ्या मुंबई पोलिसांबद्दल काही बरळेलले मीच काय, कोणताही सच्चा मुंबईकर सहन करणार नसल्याचे अमेय खोपकर यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात अमेय खोपकर यांनी ट्विट केले असून त्यात माझ्या मुंबई पोलिसांबद्दल ‘जजमेंटल’ होऊन कुणीही ‘पंगा’ घेऊ नये. मुंबईत आज आमच्या बहिणी मध्यरात्रीसुद्धा कामावरुन घरी बिनधास्तपणे जातात, याला कारण आहेत माझे मुंबई पोलीस. आज मुंबईत मी सुरक्षित आहे ते केवळ माझ्या मुंबई पोलिसांमुळे. कामाचा कितीही ताण असो, पगार अनियमित असो, मनुष्यबळ कमी असो, ऊन असो-पाऊस असो…कशीचीही पर्वा न करता हिंमतीने पाय रोवून उभे राहतात ते माझे मुंबई पोलीस. ज्या कुणाला माझ्या या मुंबई पोलिसांची भीती वाटते त्यांनी खुशाल आपापल्या राज्यात जाऊन असुरक्षित राहावे. याला धमकी समजा किंवा सल्ला. पण माझ्या मुंबई पोलिसांबद्दल काही बरळेलले मीच काय, कोणताही सच्चा मुंबईकर सहन करणार नाही, असे म्हटले आहे.