पाकव्याप्त काश्मीरशी मुंबईची तुलना करुन फसलेल्या अभिनेत्री कंगना राणावतवर सध्या सर्वच माध्यमातून टीका केली जात आहे. त्यातच मराठमोळा अभिनेता सुबोध भावे यानेही, कंगनाला सुनावताना “ताई आपल्याला जे राजकारण करायचं असेल ते आपल्या गावाला जाऊन करा”, असे म्हटले आहे. तत्पूर्वी रेणुका शहाणेनेही कंगनाच्या वक्तव्याचा समचार घेताना “उचलली जीभ आणि लावली टाळ्याला” असे ट्विट केले आहे.
“ताई, राजकारण करायचे असेल, ते आपल्या गावाला जाऊन करा”
कंगना राणावत अभिनेता सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणी सातत्याने भाष्य करत असून तिने काही दिवसांपूर्वी मला मुंबई पोलिसांचीच जास्त भीती वाटते, असे म्हणत मुंबई पोलिसांची सुरक्षा घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्यानंतर काल तिने थेट पाकव्याप्त काश्मीरशी मुंबईची तुलना केली. त्यानंतर मला शिवसेना नेते संजय राऊत यांनी धमकी दिली आणि पुन्हा मुंबईत परतू नये, असे म्हटल्याचे तिने ट्विटरच्या माध्यमातून सांगितले होते. त्याचबरोबर यापूर्वी मुंबईच्या रस्त्यांवर ‘स्वातंत्र्या’च्या घोषणा देण्यात आल्या. आता उघडपणे धमक्या मिळत आहेत. ही मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटते?, असे ट्विट करत कंगना म्हणाली.
सुबोध भावेने तिच्या या ट्विटवर प्रतिक्रिया दिली आहे. ताई आपल्याला जे राजकारण करायचे असेल, ते आपल्या गावाला जाऊन जरूर करा. जिथे तुम्हाला काम मिळाले, ओळख मिळाली त्या शहराचा आणि राज्याचा मान ठेवा, असे म्हणत सुबोधने कंगनाला सुनावले आहे.
यापूर्वी ‘कंगनाव्हायरस’ असा हॅशटॅग वापरत चित्रपट दिग्दर्शक केदार शिंदे यांनीही या मुंबईने कित्येक लोकांना डोक्यावर घेतले आणि कित्येकांना पायदळीही तुडवले! जन्मभूमी कर्मभूमी आहे ही. आई आहे ही. खाऊन भरल्या ताटात…… #निषेध #kanganavirus ” असे म्हणत कंगनाच्या वक्तव्याचा निषेध केला. सध्या अनेक नेटकऱ्यांकडून कंगनाच्या वक्तव्यावर सोशल मीडियावरही टीका होत असून ‘आमची मुंबई’ हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंडमध्ये आला आहे.