आर्थिक चणचणीमुळे गोठ्यात सराव करणाऱ्या सोनालीला रोहित पवारांचा मदतीचा हात


अहमदनगर – एक उदयोन्मुख हरहुन्नरी कुस्तीपटू सोनाली कोंडीबा मंडलिक अहमदनगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यात कापरेवाडी गावात राहत असून ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत सोनालीने कुस्ती क्रीडाप्रकारात २ वेळा सुवर्ण पदक जिंकले आहे. त्याचबरोबर तिने इतर अनेक स्पर्धांमध्ये भरपूर पदके मिळवली आहेत. पण सध्या सोनालीचा घरीच तयार केलेल्या झोपडीच्या तालमीतच सराव सुरू आहे. ५ व्यक्तींच्या कुटुंबाचा गाडा वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने हाकत आहेत.

सोनालीच्या वडिलांची इच्छा आहे की कुस्ती क्रीडाप्रकारात भारताचे त्यांच्या मुलीने प्रतिनिधित्व करावे. राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांसाठी मुलीला तयार करण्याच्या उद्देशाने ते स्वतःसाठी घर नसतानाही गोठयात राहून तिच्या खेळाची तयारी करून घेत आहेत. सध्या कर्जतच्या महाविद्यालयात सोनाली १२वीचे शिक्षण घेत आहे. तिला आर्थिक पाठबळ मिळाले तर तिच्या स्वप्नांना नक्कीच भरारी मिळेल आणि ती भारताचे प्रतिनिधित्व करेल, असा विश्वास व्यक्त करत तिला मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

एका ट्विटद्वारे सोनालीच्या संघर्षाची कहाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांना समजल्यानंतर या प्रकरणाची त्यांनी त्वरित दखल घेत स्तुत्य असा निर्णय घेतला. सोनालीने खडतर परिस्थितीत मिळवलेल्या या यशाचा मला अभिमान आहे. तिच्याशी, तिचे पालक आणि वस्ताद यांच्याशी माझे बोलणेही झाले. या भगिनीच्या प्रशिक्षणाची जबाबदारी मी स्वीकारलीय. यशाची अशी अनेक शिखरे ती सर करेल, असा मला विश्वास आहे, असे ट्विट करत त्यांनी सोनालीला मदतीचा हात दिला. दरम्यान रोहित पवार यांच्या या स्तुत्य निर्णयाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.