
पंढरपूर : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासह एक हजारांपेक्षा जास्त जणांवर ‘विठ्ठल मंदिर खुले करा,’ या मागणीसाठी पंढरपुरात केलेल्या आंदोलनाप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. रात्री उशिरा पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याची फिर्याद शहर पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल परशुराम शिंदे यांनी दिली आहे.
पंढरपुरातील आंदोलनाप्रकरणी प्रकाश आंबेडकर यांच्यासह एक हजारांपेक्षा जास्त जणांवर गुन्हा दाखल
विश्व वारकरी सेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांसमवेत प्रकाश आंबेडकर यांनी काल (31 ऑगस्ट) पंढरपुरात आंदोलन केले. जिल्ह्यात कोरोनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार लॉकडाऊन प्रतिबंधात्मक आदेश असताना 1100 ते 1200 लोकांचा जमाव प्रकाश आंबेडकर यांनी जमवला. यावेळी मास्क घातला नाही तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नाही. संचारबंदी व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन, साथीचे रोग प्रतिबंध अधिनियमामधील तरतुदीचे उल्लंघन करुन ठिय्या आंदोलनासाठी एकत्र जमा होऊन घोषणाबाजी केल्यामुळे प्रकाश आंबेडकर, अरुण महाराज बुरघाटे, आनंद चंदनशिवे, धनंजय वंजारी, अशोक सोनोणे, सौ. रेखाताई ठाकूर, हभप नामद महाराज, बबन शिंदे, सागर गायकवाड, रवी सर्वगोड, गणेश महाराज शेटे आणि माऊली हळणवर या नेत्यांसह 1100 ते 1200 आंदोलकांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
