जेईई, नीट परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची परवानगी


मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जेईई आणि नीट परीक्षा होणार यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी कसे पोहोचणार हा प्रश्न उपस्थित झाला होता, ही बाब लक्षात घेत लोकल ट्रेनने जेईई, नीट परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींना प्रवास करण्याची परवानगी मिळाली आहे.

रेल्वे स्टेशनमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी असणारे अॅडमिट कार्ड पाहून प्रवेश दिला जाणार आहे. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर याबाबतचे परिपत्रक मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने जारी केले आहे. या विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्सिंग आणि सुरक्षेचे सर्व नियम पाळून प्रवास करण्याची मुभा दिली जाणार आहे.

कोरोना संकटात 1 ते 6 सप्टेंबर या दरम्यान जेईईची परीक्षा, तर 13 सप्टेंबर रोजी नीटची परीक्षा होणार आहे. पण देशातील कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष करत आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात काँग्रेसने संपूर्ण देशात सोशल मीडियावर आंदोलन देखील केले.

नीट आणि जेईईच्या परीक्षांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोनदा स्थगिती देण्यात आली आहे. या परीक्षा आधी मे महिन्यात नियोजित होत्या. त्यानंतर ही परीक्षा जुलै महिन्यात पार पडणार होती. पण कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने जुलै महिन्यातील परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्यात येणार आहे. आता जेईई मेन परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर रोजी आणि नीट परीक्षा 13 सप्टेंबर रोजी पार पडणार आहे.