विदर्भातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार


मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विदर्भातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यास नकार देत न्यायालयाने पूरग्रस्त विद्यार्थ्यांची जेईई, नीट परीक्षा पुढे ढकलता येणार नसल्याचे म्हटले आहे. पुराचा पूर्व विदर्भात शेकडो गावांना फटका बसला असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी जेईई आणि नीटसाठी तयारी केलेल्या १७ हजार विद्यार्थ्यांसमोर परीक्षा देण्याचा प्रश्न निर्माण झाल्याची दखल घेतली. स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेत या पूरग्रस्त विद्यार्थ्यांची परीक्षा पुढे ढकलता येईल का, अशी विचारणा न्यायालयाने राज्य व केंद्र सरकारला केली होती. यावर तातडीने मंगळवारी सकाळी सुनावणी घेण्यात आली.

परीक्षा पुढे ढकलण्याचा अधिकार जिल्हा दंडाधिकारी यांना नसून राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) हीच योग्य संस्था असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. न्यायालयाने यावेळी संपूर्ण परीक्षा पुढे ढकलली जाऊ शकत नसल्याचेही म्हटले. परीक्षा पुन्हा घेण्याची विनंती पूराचा फटका बसणारे विद्यार्थी करु शकतात. पण ठरल्याप्रमाणे परीक्षा पार पडायलाच हव्यात असे न्यायालयाने म्हटले आहे. परीक्षेसाठी प्रवासात अडचण असल्याने हजर राहू न शकणारे विद्यार्थी सादरीकरण करु शकतात. पण परीक्षा पुढे ढकलण्यासाठी एनटीएच योग्य संस्था आहे. एनटीए जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय घेऊ शकते, असे न्यायालयाने सांगितले आहे.