भाजपच्या तक्रारीनंतर फेसबुकने बंद केली भीम आर्मी, रवीश कुमार यांचे समर्थन करणारी १४ पेजेस


नवी दिल्ली – २०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी फेसबुकला भारतीय जनता पार्टीने एक यादी दिल्याची माहिती समोर आली असून ४४ भाजपविरोधी पेजेसची नावे भाजपने दिलेल्या या यादीमध्ये होती. भारतीय जनता पार्टीमार्फत फेसबुककडे भाजपला विरोध करणाऱ्या आणि टीका करणाऱ्या या पेजेसवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. या पेजेसकडून अपेक्षित नियमांचे पालन केले जात नसल्याचे भाजपने म्हटले होते. तसेच तथ्यहीन माहिती या पेजेसवर शेअर केली जात असल्याचा दावाही भाजपने केला होता.

सध्या फेसबुकवर भाजपने दिलेल्या यादीपैकी १४ पेजेस नसल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. जी पेजेस बंद करण्याची मागणी भाजपने केली होती, त्यामध्ये भीम आर्टीचे अधिकृत अकाऊंट, ‘वी हेट बीजेपी’, काँग्रेसचे समर्थन करणारी काही पेजेसबरोबरच द ट्रूथ ऑफ गुजरात नावाच्या पेजचाही समावेश होता. जी पेजेस भाजपने तक्रार केल्यानंतर बंद करण्यात आली, त्यामध्ये पत्रकार रवीश कुमार आणि विनोद दुआ यांचे समर्थन करणारी काही पेजेसही आहेत.

फेसबुक इंडियाकडे आधी दिलेल्या यादीमधील १७ पेजेस पुन्हा सुरु करण्यात यावी अशी मागणी मागील वर्षी सप्टेंबरमध्ये भाजपने केली. त्याचबरोबर भाजपने दोन न्यूज वेबसाईटला मॉनेटाइज करण्याची मागणीही केली. चौपाल आणि ओपइंडिया या दोन वेबसाईटचा यामध्ये समावेश आहे. भाजपचे समर्थन करणारा मजकूर पोस्ट करण्यासाठी आणि उजव्या विचारसरणीच्या वेबसाईट म्हणून या दोन्ही वेबसाईट प्रसिद्ध आहेत. फेसबुकने भाजपच्या मागणीनंतर १७ पेजेस पुन्हा सुरु केली आहेत. भाजपला दिलेल्या माहितीमध्ये फेसबुकने ही पेजेस चुकून हटवण्यात आली होती. यासंदर्भात भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालविय आणि फेसबुक इंडियामध्ये इमेलवरुन चर्चा झाली होती.

यासंदर्भात द इंडियन एक्सप्रेसला चौपालचे संस्थापक विकास पांड्ये यांनी दिलेल्या माहितीनुसार कंटेट मॉनेटाइज करण्याला फेसबुककडून परवानगी देण्यात येत नव्हती. फेसबुकने या पेजेसेच्या मॉनेटायइजेशनवर मार्च २०१९ मध्ये बंदी घातली होती. पेज मॉनेटायझेशनवर बंदी घातल्यानंतर पेजवरील कंटेटंमधून आर्थिक फायदा मिळवण्यात अडचणी निर्माण होतात. चौपालने २०१८ पासून आतापर्यंत राजकीय जाहिरातबाजीवर पाच लाखांहून अधिक खर्च केला आहे. ओपइंडियाचे दोन लाखांहून अधिक फॉलोअर्स असून त्यांनी मार्च ते जून २०१९ दरम्यान राजकीय जाहिरातींवर ९० हजार रुपये खर्च केले आहेत.