१८०० रुपयांवरुन वाद घालणाऱ्या 'त्या' मावशींची राज्य सरकारने घेतली दखल - Majha Paper

१८०० रुपयांवरुन वाद घालणाऱ्या ‘त्या’ मावशींची राज्य सरकारने घेतली दखल


मुंबई – काल दिवसभर सोशल मीडियात एका कामवाल्या मावशींचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडीओत घरकाम करणाऱ्या या मावशी काही तरुणांसोबत १८०० रुपयांवरुन भांडत असल्याचे पहायला मिळत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियात अनेकांनी गंमतीशीर आणि मनोरंजनासाठी शेअर केला होता. पण राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण मंत्रालयाने या व्हिडीओची गंभीर दखल घेतली आहे.

यासंदर्भात महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी फेसबुक पोस्ट लिहिली असून त्यात त्यांनी सध्या सोशल मीडियावर घरकाम करणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आपण मेहनत करून घर चालवणाऱ्या या महिलांचा सन्मान केला पाहिजे. भारतीय अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्थेचा या महिला कणा आहेत. हिशोबात चूक होणे, हा थट्टेचा विषय होऊ नये, अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

courtesy – social media

तसेच आर्थिक साक्षरतेवर महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे कार्यक्रम राबवले जातात. आम्ही आमच्यासाठी ही घटना आव्हान म्हणून पाहत आहोत. आम्ही लवकरच आर्थिक साक्षरतेचा कार्यक्रम अधिक व्यापक करण्यासाठी कार्यक्रम हाती घेत असल्याचेही मंत्री यशोमती ठाकूर यांनी जाहीर केले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होऊन त्या मावशींची थट्टा उडवण्यात येत होती. त्या मावशी या व्हिडीओत घरकामाचे १८०० रुपये मागत होती, ज्या तरुणांशी ती भांडत होती त्यांनी १८०० रुपये दिल्याचे वारंवार सांगत होते, पण त्या मावशी आपल्या म्हणण्यावर ठाम होत्या

घरकाम करणाऱ्या एका महिलेचा व्हिडीयो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल आहे. मेहनत करून घर चालवणाऱ्या या महिलांचा आपण सन्मान…

Posted by Adv. Yashomati Thakur on Sunday, 30 August 2020

यात तरुणांनी सांगितल्याप्रमाणे घरकाम करणाऱ्या मावशींना ५०० च्या तीन नोटा, दोनशेची एक नोट आणि शंभराची एक नोट दिल्याचे सांगत होते. पण ते या मावशींनी मान्य केले, पण माझ्या हक्काचे १८०० रुपये पाहिजेत, असे त्यांचे म्हणणे होते. मला ५०० च्या तीन नोटा दिल्या, मी खोटे बोलणार नाही, दीड हजार आणि तीनशे दिल्याचे या मावशींनी मान्य केले, पण १८०० रुपये कुठे असल्याचे त्या मावशी वारंवार विचारत होत्या. यावर तरुण त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होते, पण मावशी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. सोशल मीडियावर काही मिनिटांचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी या व्हिडीओचा वापर करुन मोदी सरकारवर निशाणा साधला होता. आर्थिक साक्षरता, घसरलेल्या जीडीपीवरुन राज्यातील सत्ताधाऱ्यांनी केंद्रातील विरोधकांना लक्ष्य केले होते.