आरोग्य विभागात रोहित पवारांची ढवळाढवळ धोकादायक – राम शिंदे


कर्जत – राज्याचे माजी मंत्री आणि भाजप नेते राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्या टीका करताना त्यांना कोणत्याही प्रकारचे ज्ञान नसताना कर्जत-जामखेडमध्ये ते कोरोना या जीवघेण्या महामारीच्या परिस्थितीमध्ये आरोग्य विभागात राजकीय हस्तक्षेप करून अनेक नागरिकांच्या जीविताशी खेळत असल्याचे म्हटले आहे.

राम शिंदे यांनी नुकतीच कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयामधील कोविड सेंटरला भेट दिली. त्यांनी यावेळी तेथे असलेले रुग्ण, त्यांची असलेली सर्व व्यवस्था, समस्या जाणून घेत पाहणी केली. काही रुग्णांची त्यांनी यावेळी मोठ्या आस्थेने चौकशी केली, त्याचबरोबर घाबरू नका मी तुमच्या सोबत आहे, काहीही अडचण आली तर थेट मला संपर्क करा, असेही सांगताना काळजी घ्या आणि लवकर बरे होऊन बाहेर, या असा धीर दिला.

जामखेड येथील तालुका आरोग्य अधिकारी खराडे यांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगर येथे बदली करण्यात आली. कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयामधील काही वैद्यकीय अधिकारी यांना नगर येथे पाठविण्यात आले. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली. माजी मंत्री राम शिंदे म्हणाले की, राज्यासह तालुक्यात कोरोनाने थैमान घातले असताना लोकांच्या जिवाशी काही नेते खेळत आहेत याचा त्यांना विसर पडला आहे.

डॉक्टर व प्रशासन यांना या ठिकाणी काम करू द्यावे. त्यांचा वैद्यकीय क्षेत्रामधील अनुभव महत्त्वाचा असतो. पण माहिती नसतानाही काहीजण हस्तक्षेप करीत आहेत, ही बाब नक्कीच योग्य नाही. तालुक्यात आज म्हणाव्या तेवढ्या प्रमाणात कोरोना चाचण्या होत नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. या आजारावर सध्या लस उपलब्ध नसल्यामुळे जास्तीत जास्त चाचण्या करून त्यांच्यावर उपचार करणे हा एकमेव पर्याय असल्याचे राम शिंदे यांनी म्हटले आहे.