मुकेश अंबानींचा झाला बिग बाजार


नवी दिल्ली : टेलिकॉम क्षेत्रात भूकंप आणल्यानंतर मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सने आता रिटेल आणि होलसेल क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता फ्युचर ग्रुपचा रिटेल बिजनेसमधील बिग ब्रँड म्हणून नावलौकिक असलेल्या बिग बाजारसह इतर काही कंपन्या आता मुकेश अंबानी यांच्या ताब्यात येणार आहेत. रिलायन्स ग्रुपकडून याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

फ्युचर ग्रुपचा रिटेल आणि होलसेल बिझनेस तसेच लॉजिस्टिक अँड वेअरहाऊसिंग बिझनेस रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडने (RRVL) तब्बल 24,713 कोटी रुपयांना खरेदी केला आहे. रिलायन्समध्ये फ्यूचर ग्रूप आल्यानंतर आता रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड (RIL) देशातील सर्वांत मोठा रिटेल उद्योग समूह ठरणार आहे.

देशभरातील बिग बाजार, फूड बाजार, ई-झोन आणि अन्य रिटेल यांची 1800 फ्यूचर रिटेल स्टोअर्स या नव्या करारामुळे रिलायन्सला मिळणार आहेत. बिग बाजार ताब्यात घेतल्यानंतर फ्युचर ग्रुप एंटरप्रायझेसमध्येही रिलायन्स मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणार असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर ली कूपर आणि All हे कपड्यांचे ब्रँड सोडता इतर रिटेल आउटलेट रिलायन्सकडे येणार आहेत.

सध्या 11,784 स्टोअर्स रिलायन्स रिटेलकडे आहेत. फॅशन, फूटवेअर, इलेक्ट्रॉनिक्स, ज्वेलरी, प्रीमिअम फॅशन यापासून ते किराणा, इलेक्ट्रॉनिक्स आणि कनेक्टिव्हिटीपर्यंत सगळे उद्योग रिलायन्सच्या मालकीचे झाले आहेत. गेल्या वर्षातील रिलायन्स रिटेलची उलाढाल 1,63,000 कोटी रुपये एवढी होती. आता नव्या करारांमुळे आणि नव्या कंपन्या जोडल्या गेल्यामुळे यात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.