'देऊळ बंद'चा निर्णय हा केंद्रातील भाजप सरकारचाच; संजय राऊत - Majha Paper

‘देऊळ बंद’चा निर्णय हा केंद्रातील भाजप सरकारचाच; संजय राऊत


मुंबई: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्याचा आणि मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय हा केंद्रातील भाजप सरकारचाच होता, पण मंदिराचे सुद्धा एक अर्थकारण आहे. अनेक कुटुंबांची त्यावर उपजीविका अवलंबून असल्यामुळे मंदिरे बंद राहणे आम्हालाही आवडत नसल्याचे म्हणत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपला खडेबोल सुनावले आहेत.

केंद्र सरकारचाच देशभरातील मंदिरे बंद करण्याचा किंवा लॉकडाऊन उघडण्याचा निर्णय होता. काही राज्यातील मंदिरे उघडली त्याचे परिणाम सर्वांनी पाहिलेच आहेत. अयोध्येत राम मंदिराचे पूजन होण्यापूर्वी आणि नंतर अनेकांना कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले. त्यातून पुजारीही सुटू शकले नाहीत. तिरुपती बालाजीचे मंदिर उघडल्यानंतर तिथे काय परिस्थिती उद्भवली हे तुम्हाला माहीतच आहे, असे सांगतानाच आम्हीही देवभक्त आहोत. देऊळ बंद करणे आम्हालाही आवडत नाही. कोरोना हा मानवनिर्मित नाही, केंद्रातील मंत्रीच म्हणतात की कोरोना ही देवाची करणी असल्याचा टोलाही त्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना लगावला.

मंदिरे सुरू व्हावीत म्हणून देवासाठी आम्ही झगडत आहोत. कारण मंदिराचेही एक अर्थकारण आहे. अनेक कुटुंब मंदिराच्या अर्थकारणावर जगत आहेत. मंदिरापरिसरातील अनेक दुकाने सुरू असतात, त्यामुळे अनेकांना रोजगार मिळतो. पण मंदिर हा श्रद्धेचा विषय आहे. राजकारणाचा नसल्याचे सांगतानाच मंदिरे सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच निर्णय घेतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.