…धोका पत्करू शकत नसल्याचे म्हणत सर्वोच्च न्यायालयाचा मोहरम मिरवणुकींना नकार


नवी दिल्ली – यंदा देशावर कोरोनाचे संकट ओढावल्यामुळे सर्व धर्मियांच्य सणांवर बंधने आली आहेत, त्यातच आता सर्वोच्च न्यायालयाने मोहरमनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीलाही नकार दिला आहे. मोहरम मिरवणूक काढण्यासाठी परवानगी देण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिकाकर्त्यांनी धाव घेतली होती. नागरिकांच्या आरोग्याबद्दल धोका घेऊ शकत नसल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली.

देशभरात कोरोना संकटामुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली असून, सरकारकडून कोरोना प्रादुर्भावचा धोका लक्षात घेऊन अनेक वार्षिक कार्यक्रमांबरोबर धार्मिक सण उत्सवांवरही बंधने आणण्यात आली आहेत. दरम्यान, लखनौ येथील याचिककर्त्यांने मोहरम मिरवणूक काढण्यास परवानगी देण्याची मागणी करणारी याचिका केली होती.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंठपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने यावेळी याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळून लावत देशभरात मोहरम मिरवणुका काढण्यास नकार दिला. न्यायालय म्हणाले, आम्ही जर मोहरम मिरवणूक काढण्यास परवानगी दिली तर गोंधळ होईल आणि एका विशिष्ट समुदायाला कोरोनाचा प्रादुर्भाव केला म्हणून लक्ष्य केले जाईल आणि तेच आम्हाला नको असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.