यंदा उत्सव मंडपातच होणार पुण्यातील मानाच्या गणपतींचे विसर्जन; गणपती मंडळाच्या अध्यक्षांची माहिती


पुणे – देशासह राज्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने करण्याचा निर्णय पुण्यातील मानाच्या आणि इतर प्रमुख गणपती मंडळांनी घेतलेला आहे. त्यानुसार मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांनी प्राणप्रतिष्ठापना, धार्मिक कार्यक्रम यंदा साधेपणाने केले आहेत. आता मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळाच्या अध्यक्षांनी पत्रकार परिषदेत यंदाचे विसर्जन देखील सांगता मिरवणूक न होता उत्सव मंडपातच केले जाणार असल्याची अशी माहिती दिली.

या पत्रकार परिषदेत मानाचा पहिला कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार, मानाचा तिसरा श्री गुरूजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रविण परदेशी, मानाचा चौथा श्री तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विवेक खटावकर, मानाचा पाचवा केसरीवाडा गणपतीचे अनिल सकपाळ, अखिल मंडई मंडळाचे संजय मते, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे, पुनीत बालन यांच्यासह नितीन पंडित, पृथ्वीराज परदेशी यांची उपस्थिती होती.

मंडळाचे पदाधिकारी यावेळी पत्रकार परिषदेत म्हणाले की, सकाळी १०.३० वाजता श्री कसबा गणपतीला पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ हे पुष्हाहार अर्पण करतील व सकाळी ११.३० वाजता कसबा मंडळाच्या गणपती मूर्तीचे विसर्जन होईल. तर दुपारी १२ वाजून २५ मिनिटांनी श्री तांबडी जोगेश्वरी गणपती मूर्तीचे विसर्जन होईल, त्याचबरोबर श्री गुरुजी तालीम मंडळाच्या गणपती मूर्तीचे दुपारी १ वाजता, त्या पाठोपाठ श्री तुळशीबाग मंडळाच्या गणपती मूर्तीचे दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी व केसरी वाड्यातील गणेश मूर्तीचे दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी विसर्जन होणार आहे. याचबरोबर श्रीमंत भाऊ भाऊसाहेब रंगारी मंडळाच्या गणपती मूर्तीचे दुपारी ३.१५ मिनिटांनी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या गणेश मूर्तीचे सूर्यास्ताच्या वेळी व अखिल मंडई मंडळाचा गणपती मूर्तीचे सायंकाळी सात वाजता विसर्जन होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच, शहरातील गणेश मंडळांनी मंडपाच्या आणि घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन मंडपात व घरीच करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी करण्यात आले.

लोकमान्य टिळक यांचे स्मृती शताब्दी वर्ष म्हणून यंदाचे वर्ष हे साजरे केले जात असून त्या पार्श्वभूमीवर सोमवार ३१ ऑगस्ट रोजी पूर्वसंध्येला मंडळांचे अध्यक्ष आणि पदाधिकारी एकत्रपणे केसरी वाडयात आरती करुन लोकमान्यांना मानवंदना देणार असल्याची माहिती देखील या पत्रकार परिषदेत देण्यात आली.