नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंना कोरोनाची लागण


नागपूर : नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना देखील कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले असून याबाबतची माहिती त्यांनी स्वत: ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. तसेच माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घेण्याची विनंतीही त्यांनी केली.

माझा कोरोना चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून माझ्यात कोणतीही लक्षणे नाहीत, पण नियमानुसार मी स्वत:ला आयसोलेट केले आहे. मागील 14 दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांना मी विनंती करतो की, त्यांनी देखील चाचणी करुन घ्यावी. नागपूरमधील कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी मी घरातूनच काम करत आहे. आपण नक्कीच जिंकू, असे तुकाराम मुंढे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

तुकाराम मुंढे यांनी नागपुरातील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी अनेक कठोर पावले उचलली, अनेक मास्टरप्लॅन केले आहेत. तसेच कोरोना रुग्णांवर उपचारासाठी बेड उपलब्ध व्हावेत आणि या रुग्णांची कोणतीही लुटमार होऊ नये यासाठी तुकाराम मुंढे यांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे.