एमबीबीएसचे विद्यार्थी गिरवणार महामारीचे धडे!


मुंबई : मागील अनेक वर्षांपासून जगावर अनेक साथीच्या रोगांचे संकट ओढावले होते. त्याचबरोबर या साथीच्या रोगांनी कशा प्रकारे हाहाकार माजवला, हे आपण बातम्यांच्या माध्यमातून वाचले किंवा ऐकले देखील असेल. पण साथीच्या रोगांना कसे सामोरे जावे, याचे तंत्रशुद्ध, सखोल असे शास्त्रीय शिक्षण आतापर्यंत एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना मिळत नव्हते. पण एमबीबीएसचे विद्यार्थी यापुढे महामारीचे धडे गिरवणार आहेत.

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना पाच वर्षाच्या कालावधीत पीपीई किटच्या वापरापासून, चाचणी ते महामारीच्या काळात आरोग्य व्यवस्थापन कशा पद्धतीने असावे, तसेच फक्त या आजारांवर उपचार कसे द्यायचे, यापेक्षा सामाजिक, कायदेशीर आणि अशा आजाराचा हाहाकार झाल्यास कशा पद्धतीने हाताळायचा असा विद्यार्थी घडवण्यासाठी, बोर्ड ऑफ गव्हर्नर्स अर्थात भारतीय वैद्यकीय परिषदेने महामारीचे व्यवस्थापन हा विषय ‘एमबीबीएस’च्या अभ्यासक्रमात अंतर्भूत करण्याचा निर्णय घेतला आहे.

हा अभ्यासक्रम भारतातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयात शिकवला जाणार असून यापुढे हे विद्यार्थीही कोरोनासारखे संकट आल्यास त्याविरोधात लढाई लढण्यास सक्षम असणार आहे. त्यामुळे कुशल मनुष्यबळाची कमतरता जाणवणार नाही. वैद्यकीय क्षेत्रातील व्यवस्थेवर सध्याच्या परिस्थितीत कोरोनाच्या उपचाराचा ताण आल्याचे सुरुवातीच्या काळात दिसत होते. त्याचबरोबर या महामारीच्या संकटकाळात काय करावे हे कुणालाच सूचत नव्हते. कारण त्या पद्धतीचे सखोल वैद्यकीय ज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मिळतच नव्हते.

केवळ साथरोग आणि औषधवैद्यक शास्त्र विभागातील तज्ज्ञ यांच्यावर खरी भिस्त होती. कालांतराने आपल्याकडे सर्वच पॅथीच्या तज्ज्ञ आणि इतर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना याचे प्रशिक्षण देण्यात आले. पण यामध्ये खूप वेळ वाया गेला. शिवाय अशा आजाराची भीती डॉक्टरांमध्ये असल्याने तेही स्वतःला सुरक्षित मानत नव्हते. या सर्व गोष्टीवर रामबाण उपाय म्हणजे विद्यार्थी दशेतच त्यांना या सर्व गोष्टीचे ज्ञान अवगत होण्याच्या दृष्टीने हा सखोल अभ्यासक्रम बनवण्याचा निर्णय बोर्ड ऑफ गव्हर्नर्स-भारतीय वैद्यकीय परिषदेने घेतला. याकरिता वैद्यकीय शिक्षण विभागाच्या 12 तज्ज्ञांनी हा अभ्यासक्रम बनवला असून यापुढे तो ‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्यांना शिकवला जाणार आहे.

आतापर्यंत आपल्या देशात अनेक साथीचे आजार येऊन गेले आहेत. त्यापैकी स्पॅनिश फ्लू, प्लेग, सार्स, स्वाईन फ्लू, निपा व्हायरस, माकड ताप, जपानी मेंदू ज्वर, बर्ड फ्लू हे आणि असे विविध आजार वर्षभरात विविध टप्प्यावर येत असतात. याप्रकरणी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष डॉ अविनाश सुपे सांगतात की, काळाची गरज बघून सध्याचा हा अभ्याक्रम बनवण्यात आला असून त्याचा ‘एमबीबीएस’च्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात येणार आहे. यामध्ये कोरोनासारख्या महामारीमध्ये ‘एमबीबीएस’ पदवी मिळवलेला विद्यार्थी मोठ्या आत्मविश्वासाने या आजाराचा सामना करु शकेल. त्याला या अभ्यासक्रमात महामारी आणि साथीचे आजार यामध्ये आवश्यक असणाऱ्या सर्व महत्त्वपूर्ण गोष्टीचे ज्ञान पदवीला असतानाच मिळणार आहे. विशेष म्हणजे या अभ्यासाला गुण असल्यामुळे विद्यार्थ्यांना या सर्व बाबींचा अभ्यास करावाच लागणार आहे. त्याच्या साडेचार वर्षाच्या कालावधीत त्याला हा अभ्यासक्रम शिकवण्यात येणार आहे.

यापुढे या अभ्यासक्रमाद्वारे संसर्ग प्रादुर्भाव कसा रोखायचा, पीपीई किटचा वापर कसा करावा, टेस्टिंग कशा पद्धतीने करायचे त्यात चाचण्यांचे नमुने कसे घ्यावे, ते कशा पद्धतीने ठेवावे, आजाराचे व्यवस्थापन कशा पद्धतीने करावे, कशा पद्धतीची उपचारपद्धती असते ती कशी हाताळायची, साथीच्या आजाराचे व्यवस्थापन- त्यात विलगीकरण, अलगीकरण, कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग कसे करावे, त्याची माहिती शास्त्रीय पद्धतीने कशी घ्यावी, मिळालेल्या डेटामधून संशोधन, चिकित्सालयीन चाचण्या, नैतिक शास्त्र, तसेच सवांद शास्त्र – टेलिमेडिसिनचा वापर या आणि अशा विविध गोष्टी ज्या महामारीच्या आरोग्य व्यवस्थपनात लागतात त्याचे सर्व ज्ञान विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. प्रामुख्याने या अभ्यासक्रमात चिकित्सालयीन औषधशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, जनऔषध वैद्यकशास्त्र, जीवरसायन शास्त्र, औषधवैद्यक शास्त्र, श्वसनविकार या विभागातील शिक्षक विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाबाबत शिकवण्यात येणार आहे.