इंटरपोलची नीरव मोदीच्या पत्नीविरोधात रेड कॉर्नर नोटीस


नवी दिल्ली – इंटरपोलने नीरव मोदीच्या पत्नीविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली असून इंटरपोलकडून ही नोटीस भारतातील मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी जारी करण्यात आली आहे. याआधी नीरव मोदीचा भाऊ नेहल आणि बहिण पूर्वी यांच्याविरोधातही इंटरपोलकडून नोटीस काढण्यात आली आहे. इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस ही एका प्रकारे आंतरराष्ट्रीय अटक वॉरंट असतो. यानंतर प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला वेग येईल. यासंदर्भातील वृत्त पीटीआयने दिले आहे.

२०१९ मध्ये नीरव मोदीची पत्नी अमी मोदीला अमेरिकेत पाहण्यात आले होते. सध्या ती नेमकी कुठे आहे याबद्दल तपास यंत्रणांना खात्रीलायक माहिती नाही. दुसरीकडे २७ ऑगस्टपर्यंत पंजाब बँक घोटाळा करुन फरार झालेल्या नीरव मोदीच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. नीरव मोदीला ब्रिटनमधील न्यायालयात घोटाळ्याप्रकरणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजर करण्यात आले होते. गेल्यावर्षी मार्च महिन्यात अटक झाल्यापासून नीरव मोदी लंडनमधील वांड्सवर्थ कारागृहात बंद आहे.

नीरव मोदीच्या कोठडीत याआधी ६ ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली होती. सध्या नीरव मोदीचे भारतात प्रत्यार्पण करण्यावरुन सुनावणी सुरु आहे. पंजाब नॅशनल बँकेसोबतच इतर जवळपास कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप नीरव मोदीवर आहे. भारतात याप्रकरणी वेगवेगळ्या यंत्रणांनी गुन्हा दाखल केला असून तपास करत आहेत. याप्रकरणी नीरव मोदीसोबत मेहुल चोक्सीही फरार आहे.

जुलै महिन्यात नीरव मोदीविरोधात ईडीने मोठी कारवाई करत नीरव मोदीची कोट्यवधींची संपत्ती जप्त करण्यात आली होती. मुंबईतील वरळीमधील समुद्र महल येथील चार फ्लॅट, फार्म हाऊस, अलिबागमधील जमीन, लंडनमधील फ्लॅट, युएईमधील घर आणि इतर गोष्टींचा जप्त केलेल्या संपत्तीत समावेश होता.