‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘मिर्झापूर’ वेब सीरिजचा दुसरा भाग


‘मिर्झापूर’ या गाजलेल्या वेब सीरिजचा दुसरा भाग लवकरच अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या वेब सीरिजची रिलीज डेट जाहिर करण्यात आली आहे. ही सीरिज येत्या २३ ऑक्टोबर रोजी अॅमेझॉन प्राइमवर रिलीज करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच ‘मिर्झापूर २’चे चित्रीकरण पूर्ण झाले असून सध्या त्याच्या डबिंगचे काम सुरू आहे.

या वेब सीरिजचा स्वत:च्या जिवापुरते उत्तर भारतातील बाहुबलींचे मर्यादित साम्राज्य, त्यातून होणारे वाद आणि साम्राज्यांतर्गत होणाऱ्या कुरघोडी हा पाया आहे. सारा प्रदेश आपापल्या पद्धतीने या बाहुबलींनी वाटून घेतलेला असतो. अखण्डा त्रिपाठीचे मिर्झापूर हे असते. गालिच्याच्या व्यवसायाआड त्याचे सारे काळे धंदे हे सुरू असतात, त्यामुळे तो कालिन भैय्या म्हणून देखील ओळखला जात असतो. त्याचा वाह्यात मुलगा मुन्ना दारूच्या नशेत मिर्झापूरमधील एका लग्नाच्या वरातीत हवेत गोळीबार करताना नवऱ्या मुलाचाच बळी घेतो.

कोणताही वकील ती केस स्वीकारत नाही, पण तो खटला लढण्यास रमाकांत पंडित तयार होतात. अर्थातच रमाकांत पंडितांच्या घरात घुसून मुन्ना दमदाटी करतो. परिणामी त्याची दोन्ही मुले गुड्डू आणि बबलू प्रतिकार करतात. त्या मुलांचा हा जोश पाहून कालिन भैय्या त्या दोघांना त्यांच्या व्यवसायात सामावून घेतात. या दोघांमुळे मुन्नाला बाजूला टाकल्याची भावना निर्माण होते. त्यातून पुढचे महाभारत घडते. या सीरिजचा पहिला भाग १६ नोव्हेंबर २०१८ रोजी रिलीज करण्यात आला होता.