यंदाच्या वर्षी दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर हजारोंच्या उपस्थितीत होणारी परंपरा खंडीत


पुणे : ऋषिपंचमीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर दरवर्षी हजारो महिलांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात येणारा अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम यंदा केवळ पाचच महिल्यांच्या उपस्थितीत पार पडला. कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाच्या सूचनांनुसार सर्वत्र यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. गर्दी टाळून पूजाआर्चा देखील पार पाडल्या जात आहेत.

त्यानुसार, पहाटेच्या सुमारास हजारो महिलांच्या उपस्थितीत दरवर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर होणारे सामूहिक अथर्वशीर्ष पठण यंदा केवळ पाच महिलांच्या उपस्थितीत ‘बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात पार पडले. येथील या उपक्रमाला ३४ वर्षांची परंपरा आहे. यंदा ती जरी खंडीत झाली नसली तरी मर्यादित स्वरुपात पार पडली.

रविवारी पहाटे १२८ व्या वर्षी ऋषिपंचमीनिमित्त अथर्वशीर्ष पठणाच्या कार्यक्रमाचे श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ आणि ट्रस्टच्यावतीने आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शितल तानवडे, सीमा लिमये, विद्या अंबर्डेकर, हेमलता डाबी, सुप्रिया सराफ या पाच महिलांनी प्रातिनिधीक स्वरुपात सहभाग नोंदवला. या महिला गेल्या १० वर्षांपासून या उपक्रमात सहभाग होत आहेत.

सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शंखनादाने अथर्वशीर्ष पठणाची सुरुवात झाली. मंदिरात उपस्थित महिलांनी ओमकार, गीत, गजर यांसह श्री गणराया चरणी अथर्वशीर्ष सादर केले. तसेच यावेळी गणरायाची आरती देखील करण्यात आली. गणपतीच्या आगमनाच्या दुसर्‍या दिवशी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती उत्सव मंडपासमोर होणाऱ्या अथर्वशीर्ष पठणाच्या कार्यक्रमाची शहरातील महिला वर्ग वाट पाहत असतात. पण यंदा कोरोनामुळे हा उत्सव नेहमीप्रमाणे भव्यदिव्य स्वरूपात करता न आल्याने सर्वांची निराशा झाली. पण तरी देखील अनेक महिलांनी मंदिराच्या बाहेरून ऑनलाइन स्वरुपात दर्शनाचा लाभ घेतला.