अवघ्या काही तासातच पाकचे घूमजाव; दाऊद इब्राहिम कराचीमध्ये नाही

नवी दिल्ली : संपूर्ण जगाला पुन्हा एकदा पाकिस्तानचा काळा चेहरा पाहण्याचे सौभाग्य लाभले आहे. कारण आता पाकिस्तानने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानमध्येच असल्याचे कबुल केले आहे. अखेर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाचा दहशतवादी संघटना आणि त्यांच्या म्होरक्यांच्या यादीमध्ये पाकिस्तानने समावेश केल्याचे वृत्त काल सगळ्याच माध्यमांमध्ये झळकले होते. आता त्याच वक्तव्यावरुन पाकिस्तानने २४ तासांत घूमजाव केले आहे. दाऊद इब्राहिम कराचीत असल्याचा दावा पाकिस्तानने फेटाळून लावला आहे. दाऊदबद्दल माध्यमांनी प्रसिद्ध केलेले वृत्त निराधार असल्याचे सांगत पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने दाऊद कराचीत असल्याचा दावा नाकारला आहे.

आतापर्यंत अनेक वर्ष दाऊद आमच्या देशात नसल्याचा दावा करण्याऱ्या पाकिस्तानला अखेर दाऊद इब्राहिम आमच्या देशातच असल्याचे मान्य करावे लागले आहे. पाकिस्तानने ही कारवाई फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्सच्या ब्लॅक लिस्टमध्ये जाण्यापासून स्वत:ला वाचवण्यासाठी केल्याचे दाखवले आहे. कराची क्लिफ्टन, सौदी मशिदीजवळ व्हाइट हाऊस असा दाऊदचा पत्ता पाकिस्तान सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेत दिला आहे. 88 दहशतवादी संघटना आणि त्यांच्या म्होरक्यांवर पाकिस्तानने निर्बंधांची कारवाई केली आहे. त्यात दाऊदच्या नावाचा समावेश आहे.

कराचीमध्ये दाऊद असल्याच्या अधिसूचनेनंतर हे वृत्त सर्वच माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले. दाऊदच्या कराचीमधील वास्तव्याच्या माहितीवरून अडचणीत आलेल्या पाकिस्तानने दाऊद कराची राहत नसल्याचे म्हटले आहे. माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तावर पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, दाऊद पाकिस्तानात नाही. काही वृत्तांमध्ये म्हटले आहे की पाकिस्तान निर्बंध घालत असून, दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असल्याचा दावा केला आहे. तो चुकीचा आहे आणि निरर्थक आहे. त्यात कोणतीही सत्यता नाही. भारतीय माध्यमांमधून दावा केला जात आहे की, काही व्यक्ती पाकिस्तानात वास्तव्याला असल्याचे आम्ही मान्य केले आहे. पण हा दावा निराधार आणि दिशाभूल करणारा असल्याचे पाक परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.